तापमानवाढीचे संकट अधिकच गहिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:05 AM2021-03-22T04:05:17+5:302021-03-22T04:05:17+5:30
मुंबई : भविष्यातील शेती अति पर्जन्यवृष्टी आणि तापमान वाढ यामुळे संकटाच्या छायेत आहे. राज्यात दिवसेंदिवस होणारी तापमानाची वाढ आणि ...
मुंबई : भविष्यातील शेती अति पर्जन्यवृष्टी आणि तापमान वाढ यामुळे संकटाच्या छायेत आहे. राज्यात दिवसेंदिवस होणारी तापमानाची वाढ आणि हवामानविषयक टोकाच्या घटना म्हणजेच उष्णतेची लाट, थंडीची लाट, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या वाढत्या घटनांमुळे भविष्यातील अन्नधान्य उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. २०३३ नंतर राज्यातील हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे बहुतांश प्रदेशातील महत्त्वाची पिके ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, तांदूळ या सारख्या पिकांचा समावेश होतो, अशा सर्व पिकांच्या उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम होतील.
स्विझरलँडमधून जानेवारी २०१९ मध्ये 'प्युअर अँड अप्लाइड जिओ फिजिक्स' या संशोधन मासिकात हवामान बदल आणि त्याचे कृषी क्षेत्रावर होणारे परिणाम या शीर्षकाने प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार जवळपास संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये २०५० पर्यंत ०.५ ते २.५ अंश सेल्सियसच्या दरम्यान वार्षिक सरासरी तापमानामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. २०३३ नंतर तापमानातील ही वाढ प्रकर्षाने जाणवणारी आहे. प्रादेशिकदृष्ट्या विचार करता कोकण आणि मध्य महाराष्ट्र या प्रदेशांच्या काही भागांमध्ये १ ते २.५ अंश सेल्सिअस तापमानाची लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे.
सदर निष्कर्ष विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती या ठिकाणी कार्यरत असणारे प्राध्यापक डॉ. राहुल तोडमल यांनी केलेल्या संशोधनातून प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार पुढील पाच दशकांमध्ये जवळपास ८० टक्के जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरी तापमान, वार्षिक किमान तापमान आणि वार्षिक कमाल तापमान यामध्ये लक्षणीय बदल झालेले असणार आहेत.
प्राध्यापक तोडमल यांच्या मते भविष्यात होणारी तापमान वाढ ज्वारी, बाजरी आणि कडधान्य यासारख्या पारंपरिक पिकांबरोबरच ऊस, कांदा, मका यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादकतेवर देखील वाईट परिणाम करणार आहे. तसेच भविष्यातील उन्हाळे अधिक तीव्र असतील आणि हिवाळ्यातील थंडी कमी झालेली असेल. २०५० पर्यंत मोसमी पर्जन्य आत सुमारे १८ ते २२ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये अनुभवलेल्या पूर परिस्थितीची पुनरावृत्ती राज्यभरात होईल.
------
सदर संशोधन महाराष्ट्र राज्यातील भविष्यातील तापमान आणि पर्जन्याचा आकृतिबंध सांगणारे असून त्यातून हे बदल मानवी अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न आणि पाणी या घटकांना प्रभावित करणार आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
- नमन गुप्ता, हवामानविषयक माजी सल्लागार, महाराष्ट्र सरकार
तीव्र पर्जन्यवृष्टीच्या काळात शेतातून वाहणारे पाण्याचे लोंढे थांबवण्यासाठी विविध पद्धतीचा वापर करून कापूस, ज्वारी आणि सोयाबीनसारख्या पिकांचे नुकसान टाळणे शक्य आहे. याशिवाय प्रतिकूल हवामानात तग धरणारे पिके निश्चितच भविष्यातील शेतीचे अस्तित्व टिकवतील.
- अ. न. गणेश मुर्थी, कृषीतज्ज्ञ