Join us

संकट टळतंय, धरणं भरताहेत; अनेक धरणांतून विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 6:27 AM

पावसाने दिलासा : जळगावला अतिवृष्टी; अनेक धरणांतून विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई:  पश्चिम महाराष्ट्रासह खान्देशात पावसाचा जोर असून  मराठवाड्यातही चांगला पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. नाशिक, जळगाव, पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याने या धरणातून विसर्ग सुरू झाल्याने  जायकवाडी व उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने एकूण धरणांच्या सरासरी पाणीसाठ्यात सहा टक्के वाढ झाली आहे. पावसाचा जोर खान्देशात जास्त असून जळगाव व नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सुरू आहे. गंगापूरसह विविध धरणातून विसर्ग सुरू असल्याने जायकवाडीच्या नाथसागर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे  गोदाकाठच्या मराठवाड्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

जळगाव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तीन तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर २३ मंडळांत ‘दम’धारा बरसल्या असून या पावसामुळे धरणांसह नदी-नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. भुसावळ नजीक असलेल्या असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे हतनूर धरणाचे जवळपास १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

नाशिकमध्ये जोर कमी, विसर्गही घटलानाशिक जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्याने गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. गंगापूर धरण ९५ टक्के भरल्याने काल धरणातून ९ हजार ८८ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला हाेता. शनिवारी तो ५ हजार ४३२ करण्यात आला आहे. तर नांदूर मध्यमेश्वर येथूनही विसर्ग कमी करून तो २१ हजार ४२४ क्युसेक करण्यात आला आहे. दारणा धरणातून होणारा विसर्ग मात्र वाढविण्यात आला असून, सध्या १,८६८ क्युसेक करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला.

गगनबावडा येथे अतिवृष्टीकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. कोयनेचा पाणीसाठा ८६ टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणातून विसर्ग सुरू असल्याने उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही संततधार पाऊस पडत आहे.  

रंगावली नदीला पूर, दहा गावांचा संपर्क तुटलानंदुरबार जिल्ह्यातील रंगावली नदीला पूर आला आहे.  खोकसा-चिंचपाडा दरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील दहा गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांना नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे.

जगबुडी इशारा पातळीवररत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीमध्ये २४ तासांत सरासरी १२४ मिलिमीटर पाऊस झाला. खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

टॅग्स :पाणीधरण