बळीराजावर संकट, ४ जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस; तातडीने पंचनामे करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:59 AM2024-02-27T09:59:00+5:302024-02-27T10:30:04+5:30
अवकाळीमुळे पुन्हा यंदा शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून गेल्याचं दिसून येत आहे.
मुंबई - यंदाच्या वर्षी अगोदर पाऊसकाळ कमी झाल्याने संकटात असलेल्या बळीराजाला आता अवकाळीचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात डौलाने उभी असलेली पीकं आडवी झाली आहे. राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं असून आज अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यातच, आज मंगळवारी मध्यरात्री ४ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याकडे लक्ष वेधले असून ताततडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
यंदा पाऊसकाळ कमी झाल्याने शेतकऱ्याने रब्बीची पिकं अतिशय काळजीने व कमी पाण्यात नियोजन करुन उभी केली आहेत. सध्या ज्वारीचं पीक मोठ्या डौलानं शेतात उभं असल्याचं दिसून येत आहे. तर, दैनंदिन भाजीपाला आणि फळबागाही फळांना भरल्या आहेत. द्राक्षाचे गड भरले असून बाजारात आणण्यासाठी काढणीला सुरुवात होत आहे. मात्र, या काढणीपूर्वीच अवकाळीमुळे पुन्हा यंदा शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून गेल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे बळीराजाला मदत करण्याची मागणी केली आहे.
अकोला, बुलढाणा, नाशिक, जालना जिल्ह्यात रात्री मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे बळीराजावर पुन्हा अवकाळी संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळाबागांचे मोठं नुकसान झाले आहे. एकामागून एक नैसर्गिक संकट, महागाई आणि सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आधीच शेतकरी खचून गेला आहे. त्यात पुन्हा नव्याने हे संकट. अशा स्थितीत सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
अकोला, बुलढाणा, नाशिक, जालना
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 27, 2024
जिल्ह्यात रात्री मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे बळीराजावर पुन्हा अवकाळी संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळाबागांचे मोठं नुकसान झाले आहे.
एकामागून एक नैसर्गिक संकट, महागाई आणि सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आधीच…
दरम्यान, या गारपिटीमुळे रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चाळीसगाव तालुक्यात रात्री आठ वाजता विजेच्या कडकडाटसह गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. तर, जालना, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातही पावसाचा जोर दिसून आला. अवकाळीमुळे रात्रीतून झालेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. आता, अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होतो का, ते पाहावे लागेल. तसेच, शेतकऱ्यांसाठी सरकार काही निर्णय घेतो का, तेही पाहावे लागेल.