Join us

आरेतील झाडे तोडल्यास वन्यप्राण्यांच्या अधिवासावर संकट; पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:25 AM

मुंबईकरांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील

मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनी ही जैवविविधतेने नटलेली आहे. येथे पशु-पक्षी, किटक आणि झाडे यांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. परंतु मेट्रो कारशेड प्रकल्पामुळे २ हजार २३८ झाडे तोडली गेली, तर वन्यजीवांच्या अधिवासावर संकट ओढवण्याची भीती वन्यप्रेमीनी व्यक्त केली आहे.

जीवशास्त्रज्ञ राजेश सानप यांनी यासंदर्भात सांगितले की, मेट्रो कारशेडला दिलेल्या जागेवर जंगल नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे आरेतील बऱ्याच गोष्टींबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती दिली गेलेली नाही, हे सिद्ध होते. मेट्रो प्रशासनाने आधीच तेथे भरणी टाकली आहे. त्यामुळे तेथील जैवविविधतेवर किती परिणाम झाला आहे, याचा कोणीच अभ्यास केला नाही.

विकास प्रकल्पामुळे वन्यजीवांवर कोणता परिणाम होईल. हे लगेच सांगणे चुकीचे आहे. त्यासाठी त्यांची माहिती गोळा करून त्यावर अभ्यास करून भाष्य करणे गरजेचे आहे. पर्यावरणवादी अम्रीता भट्टाचार्जी यांनी सांगितले की, आरे कॉलनीमध्ये विविध प्रजातींचे पशु-पक्षी, झाडे, किटकांचा समावेश आहे. पिंपळ, वड आणि ताम्हण यांसारख्या झाडांची इकोसिस्टम असते. या झाडांवर विविध प्रजातीचे पक्षी आणि किटक राहत असतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे महत्त्वाचे योगदान असते. झाडे नष्ट झाली, तर अनेक वन्यजीवांच्या राहणीमानावर परिणाम होईल. याचा त्रास मुंबईकरांनाही भोगावा लागेल.मुंबईला आरेची गरजआरे कॉलनीतील झाडे मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी तोडली गेली, तर त्याचा निश्चितच परिणाम वन्यजीवांवर होईल. मुंबईमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्येचा अतिरिक्त भार पडत असून त्याचा सर्व ताण रेल्वे प्रशासनावर पडत आहे. जशी मुंबईला मेट्रोची गरज आहे, त्याचप्रमाणे मुंबईला आरेची गरज आहे. प्रशासन आणि मुंबईकरांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. तर या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन एक मार्ग काढावा. तरच प्रश्न मार्गी लागतील, असेही भाष्य वन्यप्रेमींनी केले.आरेचा प्रश्न हा जंगलाचा, आदिवासी जीवनशैली, विकासाचा आहे. आम्ही सगळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर असल्यामुळे निसर्गाचा ºहास कोणत्याही पातळीवर होताना बघवणार नाही. म्हणून या आंदोलनाला सहकार्य करत आहोत. - विवेक पाटील, निगर्सप्रेमी.

 

टॅग्स :पर्यावरणआरे