मंत्रालयात गर्दीत अंतराचे निकष पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:09 AM2021-02-23T04:09:04+5:302021-02-23T04:09:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि अंतर राखा ही त्रिसूत्री सांगितली जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि अंतर राखा ही त्रिसूत्री सांगितली जात असली तरी मंत्रालयासारख्या गर्दीच्या ठिकाणी या सर्वांचे पालन शक्य नाही. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सर्वसामान्य नागरिकांना तपासणी करून मंत्रालयात प्रवेश देताना अंतराचा निकष पाळला जात नाही. नागरिकांच्या गर्दीमुळे प्रवेशद्वारावर पुरता बोजवारा उडालेला असतो.
मंत्रालयात विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी गर्दी ओसंडून वाहत असते. मास्क वापराच्या बाबतीत मात्र प्रवेशद्वारावरच सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी-कर्मचारी खात्री करताना दिसतात. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मुख्य इमारत आणि ॲनेक्स इमारतीजवळ सॅनिटायझरची व्यवस्था आहे. तर, प्रत्येक मजल्यावर संबंधित विभागाच्या कार्यालयांकडून कोरोना त्रिसूत्रीबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरची व्यवस्था तपासली जाते. तर, ठिकठिकाणी राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’, अशा सूचनांचे फलक आणि स्टिकर्स लावण्यात आले आहेत.