Join us

अनोंदणीकृत हॉटेल्सना औद्योगिक दर्जा मिळण्यासाठीचे निकष जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:06 AM

अर्जाची प्रक्रिया सुरू; पर्यटन क्षेत्राला कोरोनामुळे गमवावे लागले २.८ लाख रोजगारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या ...

अर्जाची प्रक्रिया सुरू; पर्यटन क्षेत्राला कोरोनामुळे गमवावे लागले २.८ लाख रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यातील अनोंदणीकृत हॉटेल्स नोंदणीकृत करण्याचा, त्यांना औद्योगिक दर्जा देण्यासाठी शासनाचा विचार होता. त्यानुसार ३ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार पर्यटन संचालनालयाचे संचालक धनंजय सावळकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आणि राज्यातील हॉटेल्सचे औद्योगिक दर्जा मिळविण्यासाठीचे निकष ठरविण्यात आले. समितीचे काम पूर्ण झाले असून, अनोंदणीकृत हॉटेल्सना औद्योगिक दर्जा मिळविण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

कोरोना संकटकाळामुळे पर्यटन क्षेत्राला २.८ लाख रोजगार गमवावे लागले आहेत. हॉटेल्सना रोजगार मिळविण्याची संधी कमी प्रमाणात उपलब्ध असताना व्यावसायिक दराने वीज शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर भरावा लागत आहे. हे विचारात घेऊन शासनाने अनोंदणीकृत हॉटेल्ससाठी औद्योगिक दर्जा मिळविण्यासाठीचे निकष जाहीर केले असून, औद्योगिक दर्जा मिळविण्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत संकेतस्थळावर खुली केली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

* अशी आहे ऑनलाइन प्रक्रिया

महाराष्ट्र पर्यटनच्या अधिकृत संकेतस्थळावर व्हॉट्स न्यू टॅबवर जाऊन सर्व कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. अर्जदार हॉटेलच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या दिनांकापासून त्यांना औद्योगिक दर्जा व त्यानुसार सवलती लागू होतील. इच्छुक हॉटेल व्यावसायिकांनी हा शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

----------------------------