मुंबई : देशभरातील सर्व पुलांचे बांधकाम, देखभाल व दुरुस्तीतील वेल्डिंग (जोडकाम) बाबत निश्चित निकष ठरविल्यास पुलांचे आयुष्य वाढू शकेल, अशी विनंती द इंडियन इन्स्टिटयूट आॅफ वेल्डिंग या संस्थेने केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांना केली आहे.इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कमल शाह म्हणाले की, इंजिनीअरिंगमध्ये वेल्डिंग म्हणजेच जोडकामाचे विशिष्ट तंत्रज्ञान आहे. त्या निकषानुसारच पुलांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल होणे गरजेचे आहे. पश्चिम बंगालमधील हुगली नदीवर १८८७ साली बांधलेला पूल आजही भक्कम आहे, पण मुंबईत बांधलेल्या अनेक स्कायवॉक व काही पूर मात्र वापरास अयोग्य ठरवून बंद केले आहेत. याचे कारणच मुळी या पुलांचे व स्कायवॉकचे वेल्डिंगचे काम नीट झाले नसावे, असे दिसते. त्यामुळे देशभर वेल्डिंगचे निकष समान असायला हवेत आणि ते ठरवायलाही हवेत. या संस्थेतर्फे पुलांच्या बांधकामात वेल्डिंगचे महत्त्व या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद पुढील वर्षी होणार आहे. त्यात देशा-विदेशांतील तज्ज्ञ व बांधकाम विषयातील अनेक जण उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
पुलांच्या जोडकाम तंत्रज्ञानाचे निकष देशभर समान असावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 3:17 AM