वाणिज्यच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रवास खडतर
By admin | Published: May 31, 2017 04:10 AM2017-05-31T04:10:57+5:302017-05-31T04:10:57+5:30
बारावीच्या निकालात मुंबई विभागाचा शेवटचा क्रमांक लागला असला तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्केवारीत वाढ झालेली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीच्या निकालात मुंबई विभागाचा शेवटचा क्रमांक लागला असला तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्केवारीत वाढ झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तेरावीच्या प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचा प्रवास खडतर आहे. त्यात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक खडतर असल्याचे दिसून येत आहे. कारण, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि जागांमध्ये तब्बल १३ हजारांची तफावत दिसून येत आहे.
यंदाच्या वर्षी वाणिज्य शाखेच्या निकालाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे गुणांमध्येही वाढ दिसून येत आहे. या कारणांमुळे यंदा महाविद्यालयांच्या कटआॅफचा टक्कादेखील २ ते ३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वाणिज्य शाखेचे १ लाख ५२ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थी आणि जागा यांमध्ये तब्बल १३ हजार २३२ची तफावत आहे. तसेच या वर्षी विद्यापीठातर्फे नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जागा वाढण्याची शक्यताही दिसत नाही. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढणार आहे.