ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि.५ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर उभारण्यासंबंधात केलेल्या सकारात्मक वक्तव्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात सरसंघचालकांचे कौतुक करतानाच आता राममंदिराचा विषय झटकून चालणार नसल्याचे सांगत भाजपला चिमटे काढले आहेत.
केंद्रात हिंदुत्ववादी भाजपचे सरकार आहे. पण समान नागरी कायदा, राममंदिर, ३७० कलम यांसारखे विषय बासनात गुंडाळून कारभार चालला आहे. सरकार चालवायचे असेल तर ‘निधर्मी’पणाची भांग पिऊन खुर्चीवर बसावे लागते, ही सगळ्यांचीच मजबुरी बनली आहे. त्यास आमचे मित्र तरी काय करणार? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.
मंदिर उभारणीसाठी बाबरी उद्ध्वस्त करण्याचे हिमतीचे काम करणारे कोठारी बंधूं शिवसैनिक असल्यामुळेच राममंदिरावर बोलण्याचा अधिकार शिवसेनेस असल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच राममंदिराच्या उभारणीसाठी शेकडो लोकांनी बलिदान दिले असून त्याच बलिदानाच्या पायावर भाजपाने सत्तेची गरुडझेप घेतल्याची आठवण लेखात करून देत अयोध्येत राममंदिर उभारणीचा विडा उचलून कामास लागणे यात लाज वाटावी असे काहीच नसल्याचेही लेखात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ती हिंमत व धमक नक्कीच आहे. राममंदिर उभारणीचे कार्य हाती घेताच त्यांच्या अफाट लोकप्रियतेस आणखीनच चार चांद लागतील. या देशात फक्त अल्पसंख्याक समाजाचेच चोचले पुरवले जातात असे नाही तर बहुसंख्य हिंदू समाजाचाही आवाज ऐकला जातो हे दाखवून देण्यासाठी राममंदिर उभे राहायला हवे, असे उद्धव यांनी म्हटले आहे.