Join us

Eknath Shinde: मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशापूर्वी पूजा-विधी केल्याने मिटकरींची टिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 6:57 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच विशेष पूजा करून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला

मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर, एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आपला पदभार स्विकारला. विशेष म्हणजे स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खुर्चीवर बसवले. तत्पूर्वी कार्यालयात पूजा व धार्मिक विधी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच विशेष पूजा करून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान, आपल्या दालनात बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावत एकनाथ शिंदे यांनी आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदेंवर टिका केली आहे. धार्मिक विधी घरी करण्यात यावा, असे म्हणत त्यांनी शिंदेंवर टिका केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यालयात पदभार स्विकारताना धार्मिक विधी केल्याचं कळतं. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महाराष्ट्राचं मंत्रालय किंवा विधानभवन असेल, किंवा विधिमंडळाचं कामकाज हे संविधानावर चालतं. एकनाथ शिंदे हे धार्मिक आहेत, त्याबद्दल आदर आहे. मात्र, पुजा आणि विधीचे अधिकार आपल्या घरातच असावेत, ते अशाप्रकारे सेक्युलर राष्ट्रामध्ये पूजा-विधी मांडण्याचा थाट मुख्यमंत्र्यांकडून होत असेल तर निश्चितच ही गोष्ट निंदनीय आहे, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन प्रवेशावर टिका केली.

भारतीय संविधानाच्या धार्मिक अधिकारानुसार 25,26,27 आणि 28 या कलमानुसार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मात्र, शासकीय कार्यालयात हा विधी होता कामा नये, त्यामुळे महाराष्ट्रात अशाप्रकारची पूजा त्यांच्या कार्यालयात केल्यामुळे महाराष्ट्रात खरंच लोकशाही जिवंत आहे का, याचेही चिंतन झाले पाहिजे. मी या घटनेचा निषेध करतो, असेही मिटकरी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.   

मिटकरींचे राज्यपालांना पत्र

महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने राज्यपालांना दिलेल्या १२ आमदारांच्या नियुक्ती प्रस्तावाबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. यातच आता नव्या शिंदे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नवी यादी सादर करण्याची तयारी केल्याचे सांगितले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांना एक पत्र लिहून त्यातून टोला लगावला आहे. 

आपण अनेकदा घटनाबाह्य वागलात

आपल्या देशातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्य संविधानात आहेत. पी. सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. संविधान प्रेमी असाल, याबाबत मी तरी आशावाद आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटनाबाह्यच वागलात, असे मत विविध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केले. मग घाईघाईत केलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, १२ आमदारांची प्रलंबित यादी यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येत होती. तरीही आपण संविधानाचा सन्मान करत असाल, याबाबत मला शंका नाही, असे मिटकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेमुंबईशिवसेनाअमोल मिटकरी