रिलायन्सच्या फोर-जीवरून विरोधकांची सत्ताधा-यांवर टीका
By Admin | Published: February 25, 2015 10:34 PM2015-02-25T22:34:48+5:302015-02-25T22:34:48+5:30
रिलायन्स फोर-जी ला अखेर रस्ते खोदाईनुसारच दर आकारण्याचा निर्णय आता ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार,
ठाणे : रिलायन्स फोर-जी ला अखेर रस्ते खोदाईनुसारच दर आकारण्याचा निर्णय आता ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, आता दुसऱ्या टप्प्यातील खोदकामाकरिता अतिरिक्त २५ कोटी ७७ लाख ५९ हजार २०२ रुपये अदा करण्याचे आदेश पालिकेने संबंधितांना दिले आहेत. विशेष म्हणजे रिलायन्सचा हा चुकीचा ठराव गोंधळात मंजूर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे लोकशाही आघाडीने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी रस्ते खोदाईसाठी परवानगी देताना १ मीटर खोल खड्डा गृहीत धरून पैसे आकारले जात होते. मात्र, रिलायन्ससाठी विशेष नियमांतर्गत ०.५ मीटर खोदाईसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात येऊन यासंदर्भातील प्रस्ताव २९ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या महासभेत सत्ताधाऱ्यांनी गोंधळात मंजूर करून घेतला होता. रस्ता खोदण्याचे दर १५०० रुपये असताना पालिकेने रिलायन्सला हेच ७२ रुपये केले होते. परंतु, यामुळे पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होणार असल्याचा आरोप लोकशाही आघाडीने केला होता. त्यानुसार, जो प्रस्ताव मंजूर केला होता, तो रद्द करून पुन्हा फेरप्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आणावा, अशी मागणीही लोकशाही आघाडीने केली होती. अखेर, पालिकेने आता रिलायन्सला पत्र पाठवून रस्ते खोदाईनुसार दर आकारणार असल्याचे सांगत अतिरिक्त भरावयाचे आरआय चार्जेस २२ कोटी ४७ लाख ७८ हजार ९५९ आणि सुरक्षा अनामत रक्कम ३ असे एकूण साडे पंचवीस कोटी भरण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)