जयंत पाटलांची अडचण माहितीय, निलेश राणेंची प्रदेशाध्यक्षांवर बोचरी टीका
By महेश गलांडे | Published: February 15, 2021 10:42 PM2021-02-15T22:42:39+5:302021-02-15T22:46:28+5:30
शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काढला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मुंबई - पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. याप्रकरणावरील आरोपानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. त्यामुळे, आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दलच्या टीका सहन न झालेल्या दुसऱ्या राष्ट्रवादी अन् भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आता निलेश राणेंनी टीका केलीय.
शरद पवारांना माझ्याशिवाय करमत नाही, मी काहीच बोललो नाही तरीही माझ्यावर बोलतात असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काढला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. चंद्रकांत पाटील यांनीपुण्यातल्या एका अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का? असा सवालही त्यांनी केला होता. आता, यावरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी जयंत पाटलांवर प्रहार केलाय. ''पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करतायंत. आम्हाला जयंत पाटीलांची अडचण माहीत आहे, साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं, अशी बोचरी टीका राणेंनी केलीय.
पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांतदादा पाटील साहेबांवर टीका करतायत. आम्हाला जयंत पाटीलांची अडचण माहीत आहे, साखर कारखान्यांना फुकट पैसे मिळवण्यासाठी आणि सहकार शेत्रात केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 15, 2021
दरम्यान, नितेश राणेंनीही ट्विट करत म्हटले की, पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवल्यानंतर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहे. त्यामुळे मला पण एखादा कॉल करा, बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे, असं म्हणत मी वाट बघतो आहे, असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे. याआधी देखील राज्याच्या राजकारणात जे दिशाबरोबर झाले तेच पूजाबरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही? , असं ट्विट नितेश राणे यांनी केलं होतं. तर, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मला धमकीचे फोन येत असल्याचं जाहीरपणे सांगितलंय.
राम कदम यांनीही केली टीका
"चंद्रकांत पाटील यांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंत पाटील यांच्या बॉसना हे अजूनही जमत नाही," अशी बोचरी टीका राम कदम यांनी केली.