पालिकेच्या लाचखोर सहायक अभियंत्याकडे करोडोंचे घबाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:29 AM2018-04-21T01:29:08+5:302018-04-21T01:29:08+5:30
मुंबई पालिकेला वॉटर प्युरीफायर मशीन पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडून ५० हजारांची लाच घेताना अटक केलेल्या सहायक अभियंता प्रमोद भोसले याच्या मुलुंड येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी छापा टाकला.
मुंबई : मुंबई पालिकेला वॉटर प्युरीफायर मशीन पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडून ५० हजारांची लाच घेताना अटक केलेल्या सहायक अभियंता प्रमोद भोसले याच्या मुलुंड येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी छापा टाकला. भोसले याच्या घरातून २० लाख ४९ हजारांच्या रोख रकमेसह विविध २३ बँक खाती, पतपेढ्यांमधील शेअर्स, विमा पॉलिसी, मुदत ठेवींची प्रमाणपत्रे असे करोडोंचे घबाड सापडले.
मुंबई पालिकेत यांत्रिकी आणि विद्युत विभागात प्रमुख अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लाचखोर भोसलेने पालिकेला वॉटर प्युरीफायर मशीन पुरविण्याचे काम करणाºया कंपनीचे बिल थकविले होते. तक्रारदार कंत्राटदाराचे थकीत १ कोटी ८० लाख ३० हजारांचे बिल मंजूर करुन देण्यासाठी त्याने ३ लाखांची मागणी केली. याप्रकरणी कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीचे अप्पर पोलीस आयुक्त केशव पाटील, पोलीस उपायुक्त रवींद्र पाटील यांच्या मार्गदशनाखालील पथकाने तपास सुरू केला. एसीबीने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच घेतना गुरुवारी भोसलेला अटक केली.