मुंबईत दस-याच्या मुहूर्तावर कुरकुरीत फरसाणाची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 04:27 AM2017-09-25T04:27:39+5:302017-09-25T16:16:43+5:30
सरा, दिवाळीमुळे मिठाईसह फरसाणाच्याही मागणीत सध्या वाढ झालेली आहे. फरसाण आणि चिवडा खरेदीसाठी लालबागची चिवडा गल्लीही ग्राहकांनी हाउसफुल्ल होत आहे
अक्षय चोरगे
मुंबई : दसरा, दिवाळीमुळे मिठाईसह फरसाणाच्याही मागणीत सध्या वाढ झालेली आहे. फरसाण आणि चिवडा खरेदीसाठी लालबागची चिवडा गल्लीही ग्राहकांनी हाउसफुल्ल होत आहे. मोठ्या विक्रेत्यांकडे किरकोळ विक्रेत्यांसह ग्राहकदेखील मोठ्या आॅर्डर नोंदवित आहेत.
दसरा, दिवाळी असूनही यंदा फरसाणाचे दर स्थिर असल्याने, ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. फरसाणासह चिवडा, चकल्या, वेफर्स आणि शंकरपाळ्यांची मागणी वाढली आहे. दिवाळीस थोडे दिवस असले, तरी फराळाची रेलचेल वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फरसाणासह चिवड्याची मागणी वाढलेली आहे. चिवड्यामध्ये मक्याचा चिवडा, पोहा चिवडा, जैन चिवडा आणि बटाटा चिवड्याला सर्वांत जास्त मागणी आहे. प्रतिकिलो १५० ते २०० रुपयांपर्यंत हे चिवड्याचे प्रकार उपलब्ध आहेत. मागील दोन दिवसांपासून ग्राहकांच्या संख्येत भर पडत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
फरसाणाच्या प्रकारांमध्ये मिक्स फरसाण, लसूण फरसाण आणि नवरतन फरसाणला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. प्रति किलो १८० ते ३०० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, तर सुक्या मेव्याचा वापर केलेल्या फरसाणची किंमत २५० ते ५०० रुपये किलो आहे. मिसळ तयार करण्यासाठी लागणारे मिक्स फरसाण हे सर्वांचे ‘आॅल टाइम फेवरिट’ आहे. फरसाणमध्ये शेव, गाठी, तिखट शेव, खारी बुंदी, चणा डाळ आणि खारी मूग डाळ या खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे.
चिवडा गल्लीतील अनेक दुकानांमध्ये कराडहून चकली, अनारसे, सोनपापडी आयात केली जाते. पुण्यातून बाकरवड्या मागविल्या जात असल्याचेही एका विक्रेत्याने सांगितले.
राज्यातून वाढती मागणी
फरसाणाला राज्यातील अनेक भागांमधून मागणी आहे. पोहा चिवड्याला पश्चिम महाराष्टÑ आणि विदर्भातून मागणी आहे. मक्याच्या चिवड्याला कोकणातून मागणी आहे. लसूण आणि मिक्स फरसाणालाही पुणे, नाशिक आणि नागपूरमधून मागणी आहे, असे व्यापारी वर्गाने सांगितले.