मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी देखील साचलं. तर मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. याच मिठी नदीच्या पात्रात बीकेसी येथे एक ८ फुटांची मगर आढळून आली आहे. मगर दिसून येताच नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे.
'मिठी'च्या पात्रात मगर आढळून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. याची माहिती तातडीनं वाइल्डलाइफ अॅनिमल प्रोटेक्शन अँड रेक्स्क्यू असोसिएशनला (RAWW) देण्यात आली. असोसिएशनचे सदस्य अतुल कांबळे यांनी या दृश्याची पुष्टी केली आणि वन नियंत्रण कक्षाला सुचित केले. वन अधिकाऱ्यांनी सावधगिरीचं आवाहन केलं असून रहिवाशांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही असं आश्वस्थ केलं आहे.
बीकेसी परिसर बिझनेस हब म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक बड्या कंपन्यांची कार्यालयं असून दररोज लाखो कर्मचारी या परिसरात कामानिमित्त येतात. तसंच जवळच रहिवासी भाग देखील आहे.