मुंबई : अवकाळी पावसामुळे तडाखा बसलेल्या पिकांच्या नुकसानीचा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. प्राथमिक माहितीनुसार राज्यात सुमारे ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीके बाधित झाली आहेत. पंचनामे काही कारणांमुळे होऊ शकले नसतील तरीही त्यांना शासकीय मदत द्या, शेतकऱ्यांनी काढलेली हानीची छायाचित्रेही पुरावा म्हणून ग्राह्य धरा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल, असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाºयांची आढावा बैठक वर्षा निवासस्थानी घेतली.यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून अत्यंत तपशीलवाररित्या पीक परिस्थितीची माहिती घेतली.
मुख्यमंत्री म्हणाले, यावर्षी प्रचंड पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील सुपरसायक्लॉनसह चार वादळांचा फटका बसला, या पावसाची तीव्रता आॅक्टोबरच्या दुसºया व तिसºया आठवड्यात अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी, त्यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी, व्हॉट्स अॅप क्रमांक सुद्धा संपकार्साठी उपलब्ध करून देण्यात यावेत. शासनाचे या स्थितीवर संपूर्णपणे लक्ष असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे. प्रभावित भागाचे तात्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले.विभागनिहाय नुकसानकोकण (४६ तालुके/९७ हजार हेक्टर), नाशिक (५२ तालुके/१६लाख हेक्टर), पुणे (५१ तालुके/१.३६लाख हेक्टरहून अधिक), औरंगाबाद (७२ तालुके/२२ लाख हेक्टर), अमरावती (५६ तालुके/१२ लाख हेक्टर), नागपूर (४८ तालुके/४० हजार हेक्टर).