Join us

पीकविमा कंपन्या गब्बर, शेतकरी मात्र वाऱ्यावर; कंपन्यांनी वर्षभरात कमावला ५ हजार कोटींचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 5:17 AM

कंपन्यांनी शेतकऱ्यांची किरकोळ भरपाई देऊन बोळवण केल्याचे दिसून येते.

- दीपक भातुसेमुंबई : नैसर्गिक आपत्तीत शेतपिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून २०१६ साली पंतप्रधान पीकविमा योजना सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत पीक विम्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी विमा कंपन्याच हजारो कोटी रुपये नफा कमावून गब्बर झाल्याचे ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

कंपन्यांनी शेतकऱ्यांची किरकोळ भरपाई देऊन बोळवण केल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे विमा कंपन्यांनी यातून दरवर्षी तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या घरात नफा कमावल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी पिकांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि देशात २०१६ साली पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली. 

किरकोळ भरपाईवर बोळवण

पीकविमा कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा कमवत असतानाही शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिली जात नाही. त्यामुळे याप्रकरणी सांगोल्याचे शेतकरी गोरख घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याप्रकरणी सात पीकविमा कंपन्यांना नोटीस बजावली असून त्या कंपन्यांनी अद्याप या नोटिशीला उत्तर दिलेले नाही. 

नफेखोरीला आळा कसा? 

रिलायन्स इन्शुरन्स आणि भारतीय कृषी विमा या दोन कंपन्यांनी सर्वाधिक नफा कमावला आहे. या नफेखोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावाही केला होता. मात्र यात कोणताही बदल झालेला नाही.

कंपनीचे नाव    जमा हप्ता     भरपाई    फायदा    टक्केवारीएचडीएफसी इर्गो इन्शुरन्स     ७००    २०३    ४९७    २८.९९ ईफ्को-टोकिओ इन्शुरन्स    ९७८    १९९    ७७८    २०.४२ भारती ॲक्सा इन्शुरन्स    ६२९    १२१    ५०७    १९.३३ बजाज अलायन्झ इन्शुरन्स    ६६८    ८६    ५८१    १३.०१ रिलायन्स इन्शुरन्स    १०३६    ११६    ९२०    ११.२६ भारतीय कृषी विमा     १७८७    ९४    १६९२    ५.३१ एकूण    ५८०१    ८२३    ४९७८    १४.१९

टॅग्स :शेतकरीपूर