मुंबई : स्वस्तात घर तसेच पैसे दुपटीचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घालणाºया दोन दाम्पत्यांचा चारकोप आणि समतानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका जोडप्याने तीन कोटी तर अन्य जोडप्याने साडे पाच कोटींचा चुना नागरिकांना लावला.कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज येथील गार्डेनिया व्हॅली आॅफ फ्लॉवर्स इमारतीच्या सहाव्या मजल्यावर योगिता शैलेंद्र खिंडा (३८) पती आणि दोन मुलांसोबत राहते. योगिताचा नवरा शैलेंद्र हा परळच्या आनंद राठी शेअर बाजार कंपनीत काम करतो; तर योगिता ही शिबिका इंटरप्रायझेस कंपनी चालवत होती. एका वर्षात गुंतवणूक दुप्पट करून देण्याचे आमिष तिने लोकांना दिले. त्यामुळे घरातील मोलकरणीपासून, मुलांच्या मित्रांचे पालक तसेच तिच्या सासर आणि माहेरच्या लोकांपर्यंत सर्वांकडून तिने पैसे घेतले. मात्र, ते परत केलेच नाहीत. लोकांना विश्वास मिळवण्यासाठी सुरुवातीला स्वत:च्या मोलकरणीलाच तिने काही महिने गुंतवणुकीच्या दुप्पट पैसे दिले. अन्य लोकही तिच्या या आमिषाला बळी पडले. या जोडप्याने ५०हून अधिक जणांची ३ कोटींची फसवणूक केली. या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. शैलेंद्र मात्र अटकपूर्व जामिनावर सध्या बाहेर आहे.दुसरीकडे जवळपास ३१ जणांकडून घरासाठी पैसे घेऊन त्यांची फसवणूक करून पसार झालेल्या कालीदास चांदणे (४६) आणि त्याची पत्नी सोनाली (३८) यांच्या मुसक्या गुरुवारी चारकोप पोलिसांनी आवळल्या. त्यांच्या विरोधात विपुल संघवी (४९) या व्यावसायिकाने १६ एप्रिल २०१७ रोजी चारकोप पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली होती. या जोडप्याच्या नावावर जागा नसतानादेखील बनाव करून त्यांनी संघवीसह ३१ लोकांकडून पैसे उकळले. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. त्यांचा जामीन अर्ज ९ जानेवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. तेव्हापासून हे दोघे फरार होते. अखेर ते वसई परिसरात येणार असल्याची माहिती चारकोप पोलिसांना मिळाली; आणि त्यांनी सापळा रचून त्यांना अटक केली.प्रिशा डेव्हलपर्स अॅण्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने त्यांनी कंपनी उघडली होती. त्याची मुख्य व्यवस्थापक सोनाली होती. संघवी यांनी स्वत:चे घर विकून चांदणे जोडप्याला पैसे दिले होते. त्यामुळे चार वर्षे त्यांना भाडेतत्त्वावर राहण्याची वेळ आली आहे. त्यांच्याप्रमाणेच आणखी ३० लोकांना लुबाडण्यात आले आहे.
लोकांची फसवणूक करून ठग दाम्पत्य बनले करोडपती, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 5:15 AM