Join us

तिघा तस्करांकडून ड्रग्जसह कोटीचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

उपनगरात एनसीबीची कारवाई : तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) ...

उपनगरात एनसीबीची कारवाई : तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) उपनगरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तिघा तस्करांकडून मादक पदार्थांसह ७३.७२ लाखांच्या रोकडसह एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी रात्री केलेल्या कारवाईत शाहनवाज शाहीद खान, आलम नईम खान व रवी आरहान मेमन यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महिलेचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबी मुंबईच्या पथकाने रविवारी रात्री कुर्ला (प.) येथील एलबीएस रोडवरील बोरी कब्रस्तानजवळील पटेरीवाली चाळीजवळ संशयास्पदरीत्या आढळलेल्या शाहनवाज व आलम यांना पकडले. झडतीत त्यांच्याकडे ५६ ग्रॅम एमडी व ४.२० लाखांची रोकड आढळली. त्यांच्याकडील चौकशीतून मिळालेल्या माहितीतून वांद्रे परिसरातील एका महिलेच्या घरी छापा टाकून ५८५.५ ग्रॅम मेफोडीन, रोख ७३.७२ लाख रुपये आणि २९.४ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले.

दुसऱ्या कारवाईत सोमवारी सकाळी बीकेसीतील भारतनगर परिसरातून तस्कर रवी मेमन याला पकडण्यात आले. त्याच्याकडून अल्पवयीन मुलांचा तस्करीसाठी वापर केला जात होता.

या ठिकाणी ड्रग्ज तस्करीचे काम दोन महिला चालवीत असून, शाळकरी मुलांद्वारे वांद्रे, बीकेसी, कुर्ला आदी परिसरात एमडीची विक्रीचे रॅकेट चालवीत असल्याची माहिती आहे. त्या महिलांचा शोध घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.