Join us

कोट्यवधींचा धान्यसाठा जप्त

By admin | Published: March 17, 2015 10:52 PM

सावरोली येथे अनधिकृतरीत्या साठवलेल्या आणि अवैध वाहतूक करून आणलेल्या धान्याच्या ट्रकवर खालापूर तहसीलदारांनी छापा टाकून कारवाई केली.

खालापूर : सावरोली येथे अनधिकृतरीत्या साठवलेल्या आणि अवैध वाहतूक करून आणलेल्या धान्याच्या ट्रकवर खालापूर तहसीलदारांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी गहू-तांदळाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. धान्यपुरवठा दलालांनी हा साठा केल्याचे छाप्यात उघडकीस आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री दोन ट्रक संशयितरीत्या खालापूर तालुक्याच्या सावरोलीतील मे. जय फूड येथे आढळले. तहसीलदार दीपक आकडे यांनी ट्रक ताब्यात घेतले असता, वाहकाकडे आणि संबंधित गोदाम मालकाकडे योग्य कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळले. तहसीलदार आणि पुरवठा विभागाच्या पथकाने गोदामाची कसून तपासणी केली असता, करोडो रुपयाचे अन्नधान्य अनधिकृतरीत्या साठवलेले आढळले. गोदाम मालकाबाबत विचारणा केली असता, त्याच्या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तहसीलदार दीपक आकडे, पुरवठा अधिकारी रश्मी साळुंखे यांनी आवक-जावक नोंदीची कोणतीच माहिती मिळाली नसल्याने अपहाराचा नेमका आकडा समोर जरी येत नसला तरी तो कोट्यवधींच्या घरात असल्याचे पथकाने सांगितले. शासनाच्या नव्या धोरणानुसार, सर्वसामान्य नागरिकाला धान्य उपलब्ध होत नाही. अंत्योदयसारख्या योजनांच्या लाभार्थ्यांना रेशनिंगसाठी हेलपाटे घालावे लागतात. परंतु त्यांच्या हक्काच्या धान्यांचा दलालांकडून अपहार होत असल्याचे या घटनेत समोर आले आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. धान्य देणारे ट्रकचालक फरार४तहसीलदार, पुरवठा अधिकारी पंचनामा सुरू असताना गोदामात काम करणारा एकही कर्मचारी, कामगार हजर नव्हता. इतकेच काय तर गोदामात माल घेऊन आलेले ट्रकचे चालकही पसार झाले होते. पुरवठा अधिकारी रश्मी साळुंखे, कर्मचारी नितीन घुगे, सुनील मेंडके, नरसिंह सावंत, हसयान कामवाला यांनी पोलीस बंदोबस्तात माल तपासणी सुरू केली आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा हा साठा असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. अन्नसुरक्षा पथकाला पाचारण करून संपूर्ण गोदामातील धान्याची मोजदाद करण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित गोदाम मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल- दीपक आकडे, तहसीलदार, खालापूर