जहाज कारखान्याच्या मालक असल्याचे सांगत व्यावसायिकाला कोटीचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:06 AM2021-02-14T04:06:42+5:302021-02-14T04:06:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जहाज कारखान्याच्या मालक असल्याचे सांगत व्यावसायिकाकडून सुमारे एक कोटी रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जहाज कारखान्याच्या मालक असल्याचे सांगत व्यावसायिकाकडून सुमारे एक कोटी रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी मायलेकीला शुक्रवारी कल्याणमधून अंधेरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
रागिणी खंडेलवाल (५२) आणि तिची मुलगी मानसी (२२), अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावे आहेत. शिपिंग लॉजिस्टिकचा व्यवसाय असणारे व्यावसायिक सुशांत शेलटकर (३९) यांनी ऑक्टोबर, २०२० मध्ये या दोघींविरोधात अंधेरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. शेलटकर यांनी इंटरनेटवर टगबोटसंदर्भात चौकशी केली होती. त्याच्या दोन दिवसांनंतर त्यांना आमिर खान नामक व्यक्तीचा फोन आला. ज्याने खंडेलवालबाबत त्यांना माहिती दिली. मध्यस्थीच्या मदतीने त्यांनी मायलेकीची भेट घेतली.
श्री तिरुपती बालाजी कंपनीची मालक असून आणि कल्याणच्या गणेश घाट येथील जहाज कंपनीची ती सर्वेसर्वा असल्याचे त्यांनी शेलटकर यांना सांगितले. आम्ही जहाजाच्या व्यवसायात असून, अनेक मोठ्या कंपन्यांना मोठमोठे जहाज पुरविल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर विश्वास ठेवत एक टगबोट तयार करण्यास सांगून शेलटकर यांनी १ कोटी ३० लाख खंडेलवाल यांना दिले. मात्र, त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. ‘आम्ही याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. आमच्याकडे सध्या एकच प्रकरण उघडकीस आले असून, अधिक चौकशी सुरू आहे,’ अशी माहिती अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेलगे यांनी सांगितले.