पॅनकार्ड क्लबने बुडवले कोट्यवधी रुपये
By admin | Published: April 9, 2017 12:34 AM2017-04-09T00:34:25+5:302017-04-09T00:34:25+5:30
पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीमधे पनवेल व परिसरातील नागरिकांनी पैसे जमा केले होते. ६ वर्षांत पैसे दुप्पट आणि ९ वर्षांत तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून
- मयूर तांबडे, पनवेल
पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीमधे पनवेल व परिसरातील नागरिकांनी पैसे जमा केले होते. ६ वर्षांत पैसे दुप्पट आणि ९ वर्षांत तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे घेण्यात आले होते. मात्र, मुदत संपूर्न दीड वर्ष झाले तरी नागरिकांना पैसे परत मिळालेले नाहीत. नागरिकांनी जमा केलेली रक्कम परत करण्यासाठी काहींना धनादेश दिले असले तरी तेदेखील वटले नसल्याचे नागरिक सांगतात.
पनवेल शहरात पॅनकार्ड क्लब लिमिटेड या कंपनीने पनवेल शहर व तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावल्याचे समोर आले आहे.
अनेक वर्षांपासून पनवेलमध्ये सुरू असलेल्या पॅनकार्ड क्लबमध्ये गाव, वाड्या, वस्ती -पाडे आदी ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.
काही दिवसांपासून पॅनकार्ड क्लबचे कार्यालय यशो बाळकृष्ण सोसायटीमध्ये पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी पैशांसाठी पुन्हा एकदा गर्दी केली. मात्र, गुंतवणूकदारांना व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. ठेवीदार व एजंट हे या कंपनीचेच ग्राहक आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही ग्राहकांना त्यांच्या ठेवी दिल्या जात नाहीत. कंपनीने दिलेले धनादेश न वटल्याने गुंतवणूकदार पोलीस तक्रार करण्याच्या तयारीत आहेत.
या प्रकरणी पॅनकार्ड क्लब्सच्या मुंबई येथील कार्यालयाशी संपर्कसाधला असता केस चालू आहे. केस क्लियर झाल्यावर पैसे मिळणार असल्याचे सांगितले.
१० फेब्रुवारी २०१२ मध्ये पैसे भरले होते. १७ मार्च २०१६ रोजी पॅनकार्डची मुदत संपली. पैसे परत देण्यासाठी वारंवार तारखा दिल्या जात आहेत. मात्र, त्या तारखेला कार्यालयात गेल्यानंतर पुढची तारीख देण्यात येते, असे विचुंबे, पनवेल येथील केदार श्रीवास्तव यांनी सांगितले. तर, मुंबईतील कार्यालयात गेलो होतो, त्यांनी पैसे परत मिळण्यासाठी काही महिने लागू शकतात असे उत्तर दिल्याचे नवीन पनवेलमधील गुंतवणूकदार हितेश भोपतराव यांनी सांगितले.