Join us

बोगस खात्यांद्वारे कोट्यवधीची रक्कम विवेक पाटील यांच्या संस्थेत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:06 AM

कर्नाळा बँक घोटाळा अपहार प्रकरणलोकमत न्यूज नेटमुंबई : कर्नाळा बँकेच्या कोट्यवधीच्या गैरव्यवहारात शेतकरी कामगार पक्षाचे नेते ...

कर्नाळा बँक घोटाळा अपहार प्रकरण

लोकमत न्यूज नेट

मुंबई : कर्नाळा बँकेच्या कोट्यवधीच्या गैरव्यवहारात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आ. विवेक पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले. बनावट खात्यावर कर्ज मंजुरी देऊन ती रक्कम त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या खात्यात वर्ग केली होती. त्यांच्यासह अनेका नेत्यांनी हा फंडा वापरून शेकडो कोटी उकळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ईडीने मंगळवारी रात्री विवेक पाटील यांना पनवेल येथील राहत्या घरातून अटक केली. त्यांना २५ जूनपर्यंत ईडी कोठडी मिळाली आहे. ईडीच्या तपासातून अनेक बाबी समोर आल्या आहेत, पाटील यांनी बोगस अकाऊंट बनवून कोट्यवधीचे कर्ज दिल्याचे दाखवले. नंतर ते पैसे स्वत:च्या संस्थांच्या अकाऊंटमध्ये वळवले, कर्नाळा बँकेत सुमारे ५२९ कोटींचा घोटाळा झाला. २०१८ मध्ये बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले होते. रिझर्व्ह बँकेने चौकशीसाठी अधिकारी नेमला होता. चौकशीत कर्नाळा बँकेच्या व्यवहाराबाबत धक्कादायक माहिती समोर आली.

बँकेत सुमारे ६० हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत. त्यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ६३ व्यक्तींना संशयास्पदरीत्या कर्ज दिले होते. यावेळी कर्ज घेणाऱ्याकडून तारण घेतलेले नव्हते. कर्ज मंजूर कागदपत्रांवर संचालक मंडळाच्या सह्या नव्हत्या. स्टॅम्प ड्यूटीही भरण्यात आली नव्हती. अशा अनेक त्रुटी होत्या.

६३ खात्यांवर दिलेले कर्ज हे दोन खात्यांवर वळवले होते. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या खात्यावर पैसे वळवले होते. या अकॅडमी आणि ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष असलेले पाटील हेच आहेत.

......................