Join us  

पालिकेच्या अनुकंपा भरतीमध्ये कोट्यवधीचा घोटाळा

By admin | Published: December 07, 2015 12:58 AM

मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त अथवा चतुर्थ श्रेणीतील मृत कर्मचाऱ्याशी नाते जोडून अनुकंपा तत्त्वाखाली नोकरी लावणाऱ्या पालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांसह चौघा जणांना गुन्हा

मुंबई : मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त अथवा चतुर्थ श्रेणीतील मृत कर्मचाऱ्याशी नाते जोडून अनुकंपा तत्त्वाखाली नोकरी लावणाऱ्या पालिकेच्या दोघा कर्मचाऱ्यांसह चौघा जणांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दिलीप चौकेकर आणि अनिल बालिया, कुणाल जोगडिया आणि सन्नी विनजुडा अशी त्यांची नावे आहेत. चौकेकर व बालिया हे कर्मचारी असून अन्य दोघे एजंट आहेत. या रॅकेटमध्ये महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. त्यांच्याकडून आतापर्यंत ३०० जणांना अशा प्रकारे नोकऱ्या लावण्यात आल्या असून त्यातून कोट्यवधीचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत जे कर्मचारी कामाला आहेत त्यांच्या मुलाला अथवा नातेवाइकांना तत्काळ नोकरी मिळते. मात्र ज्या तरुणांचे कोणीच पालिकेत कामाला नाही अशा तरुणांना गाठून ही टोळी त्यांचे बनावट पेपर तयार करत होती. यापूर्वी जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अथवा ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे पुरावे ही टोळी तयार करून देत होती. अशा प्रकारे या टोळीने तरुणांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना पालिकेत कामाला लावले होते. पालिकेच्या डी वॉर्डात अशाच प्रकारे १० कर्मचारी कामावर रूजू झाल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने दिलीप चौकेकर आणि अनिल बालिया या दोन पालिका कर्मचाऱ्यांसह कुणाल जोगडिया आणि सन्नी विनजुडा या दोन एजंटवर गुन्हा दाखल करत अटक केली. यात मोठे अधिकारीदेखील सामील असण्याची शक्यता असल्याने पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.