मुंबई – स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या नावाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर कायमची संपेल. I.N.D.I.A अशी ही आघाडी म्हणजे I म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस संपेल, N म्हणजे त्यांच्यासोबतची NCP संपेल, D म्हणजे DMK संपेल, I म्हणजे इंडियन मुस्लीम लीग संपेल. A म्हणजे आप संपेल त्याशिवाय अन्य सगळे संपेल. देशाच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग करणे याशिवाय दुसरे दुर्दैव नाही अशा शब्दात मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक १४-१५ तासांचा इव्हेंट आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो वैगेरे आरोप आमच्यावर केले गेले. मुंबईबद्दल इंडिया आघाडीच्या बैठकीत अँलर्जी आहे. कुणी कुठे कार्यक्रम करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुंबईतील जुन्या खुर्च्या या लोकांना नको होत्या. म्हणून ४५ हजारांची एक खुर्ची अशा ६५ खुर्च्या नवीन घेण्यात आल्या. त्यामुळे १४ तासांसाठी एका नेत्याला बसायला ४५ हजारांची खुर्ची घेतली जाते त्यांना आमच्यावर बोलायचा अधिकार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्या ६५ खोल्या बुक केल्यात त्या लॉजिंग बोर्डिंगमधील नाही तर फाईव्ह स्टारमधील आहेत. मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था ताटाला ४५०० हजार रुपये. खोलीची किंमत २५-३० हजार रुपये आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेला पक्षातील आमदार हॉटेलला राहिले तेव्हा आमच्यावर टीका केली गेली. आता १४ तासांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर हे सगळे बेरोजगार होणार आहेत असा टोला मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना लगावला.
दरम्यान, इंडिया आघाडीतील अनेक पक्ष असे आहेत ज्यांनी बाळासाहेबांवर टीका केली होती. कलम ३७० रद्द करावे यासाठी बाळासाहेबांनी मागणी केली. त्यावर बहुतांश नेत्यांनी टीका केली. राम मंदिर, कारसेवा याबाबतही बाळासाहेबांवर टीका केलीय. आज महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, जी यादी हॉटेलला दिली आहे. त्यात उद्धव ठाकरे २६ नंबरवर वर शरद पवार २५ नंबरवर आहेत. महाराष्ट्रातले २ पक्ष शेवटून २-३ नंबरला आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान होऊ न देण्यासाठी असंतुष्टांची ही बैठक आहे असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.