मुंबई : ‘लोकमत - महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२२’ पुरस्कारासाठीचे नॉमिनीज जाहीर झाले आणि त्यांच्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून १,११,०५,११३ एवढे अभूतपूर्व मतदान झाले. २३ तारखेला सायंकाळी मतदान संपले. सोन्यासारख्या माणसांचा कृतज्ञ सन्मान करण्यासाठी लोकांनी केलेल्या भरघोस मतदानाचे सर्वच ज्युरींनी भरभरून कौतुक केले. या वर्षीचे ज्युरी मंडळ आणि सगळे नॉमिनीज यांची भेट हेदेखील या वर्षीचे मोठे आकर्षण ठरले.
मुंबईत झालेल्या ज्युरीची बैठक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज, मुख्यमंत्री कार्यालयाचे व राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, गुगल इंडियाचे कन्ट्री हेड संजय गुप्ता, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, ज्येष्ठ फिजिशियन डॉ. प्रतीत समदानी, लोकमत मीडियाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, संपादकीय संचालक व महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचे संस्थापक ऋषी दर्डा, लोकमत मीडियाचे कार्यकारी व संपादकीय संचालक करण दर्डा, तसेच ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांची उपस्थिती होती.
ऋषी दर्डा यांनी यावेळी सर्व ज्युरी मंडळास विविध क्षेत्रांतील नॉमिनीजच्या कार्याची माहिती दिली. प्रत्येक कॅटेगिरीतील नॉमिनीजना लाखांच्या घरात मतं मिळाली आहेत. त्यातील चुरस आणि स्पर्धा पाहून ज्युरीतील सगळ्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर सर्व ज्युरी सदस्य आणि विविध क्षेत्रांतील नॉमिनीज यांची भेट घडवून आणली गेली. ज्युरीतील सदस्यांनी अनेक नॉमिनीजना त्यांच्या कामाविषयी स्वत:च माहिती देणे सुरू केले तेव्हा सगळ्याच नॉमिनीजना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मी स्वत: सर्व नॉमिनीजची माहिती वाचून आलो होतो. ज्या पारदर्शक पद्धतीने सगळी प्रक्रिया होत आहे हे पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांसाठी हा पुरस्कार मिळणे किंवा त्यासाठी नॉमिनेशन होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री.
सगळ्या नॉमिनीजची माहिती स्वत: ऋषी दर्डा देत होते. त्यांच्याजवळ असणारी माहिती व आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर त्यांच्याकडे होते. या पुरस्कारासाठी नॉमिनेशन होणे हा एक सन्मान आहे. यानिमित्ताने या सगळ्यांचे काम राज्यभर गेले आहे. मिळालेले मतदान पाहून मी आश्चर्यचकित झालो.अशोक चव्हाण,माजी मुख्यमंत्री.
प्रशासनात, कृषी, शिक्षण क्षेत्रातून चांगले काम करणारे लोक शोधणे आणि त्यांचे संपूर्ण प्रोफाईल नि:स्वार्थ भावनेने ज्युरीपुढे ठेवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढे काम पाहून आपण अचंबित झालो आहोत. अशा चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सरकारनेदेखील सन्मान केला पाहिजे.संजय गुप्ता, गुगल इंडियाचे कन्ट्री हेड.