- गौरीशंकर घाळेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दहिसरचा भाग म्हणजे मुंबईचे टोक. कांदिवली, बोरीवली वगैरे शेजारी पाहीले तर दहिसरला मुंबईचे प्रवेशद्वार म्हणण्याऐवजी ‘टोक’ म्हणावे अशी स्थिती. आतासा दहिसर कात टाकतो आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींनतर मागील पाच वर्षात येथील राजकारणाचाही पोत बदलला आहे. वर्षानुवर्षे युतीच्या आणाभाका घेत शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसशी लठ्ठालठ्ठी केली. २०१४ ला युतीत बिघाडी झाल्यानंतर मात्र दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी एकमेकांचे हिशेब चुकते करण्याची एकही संधी सोडली नाही. विधानसभा आणि त्या पाठोपाठच्या महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेना विरूद्ध भाजपा हाच सत्तासंघर्ष इथे पाहायला मिळाला. विधानसभा आणि पाठोपाठच्या महापालिका निवडणुकीतही शिवसेना विरूद्ध भाजपा अशीच लढाई झाली. भाजपाच्या मनिषा चौधरी यांनी तत्कालीन आमदार शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांना पराभूत करत विधानसभा गाठली.या लढाईत काँग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तर शिवसेनेच्या अंतर्गत वादातून मनसेचे इंजिनावर स्वार झालेल्या शुभा राऊळांनी चौथ्या क्रमांकाची १७ हजार मते घेतली. आता शुभा राउळ स्वगृही आल्या आहेत. तरीही मागच्या पाच वर्षातील या राजकीय घमासानाचा फटका आधीच आक्रसत जाणाऱ्या काँग्रेसला बसला. महापालिका निवडणुकीत इथल्या सहा वॉर्डापैकी तीन भाजपाकडे गेली, तर तीन शिवसेनेच्या वाट्याला आली. काँग्रेसची पाटी कोरीच राहीली.विधानसभा क्षेत्रातील या संघर्षाचे पडसाद लोकसभेच्या रणांगणात उमटणार नाहीत, इतकी काळजी मात्र गोपाळ शेट्टी यांनी घेतली आहे. चार वर्षात युतीतील वाक्युद्धात आपल्या शब्दांची भर पडणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. त्यामुळे गल्लीतील भांडण गल्लीतच राहणार असे दिसते. खेरीज, प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध अजूनही संपलेला नाही. त्यामुळे दहिसर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसची हक्काची ३५-४० हजार मते राखायची कशी, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे.गणपत पाटील नगरातील नागरी समस्यांचा अभाव, कांदळवनांची कत्तल, गावठाण, कोळीवाडे आदी प्रश्नांच्या जोडीला रखडलेले एसआरए प्रकल्प आदी प्रश्न या भागात आहेत. या प्रश्नांवर खरेत विरोधकांनी संघर्षाचा पवित्रा घ्यायला हवा.यातील प्रशासकीय अडथळ्यांवर सत्ताधारीच आक्रमक पवित्रा घेतात. त्यामुळे विरोधी पक्षांना फारसे कामच उरत नाही. याचे गांर्भीय खरेतर पक्ष नेतृत्वाला कळायला हवे. दुर्दैवाने काँग्रेसमध्ये तसे होताना दिसत नाही.राजकीय घडामोडीदोन वेळा नगरसेवक राहीलेल्या राजेंद्र प्रसाद चौबे यांची अनुपस्थिती स्थानिक काँग्रेसला नक्कीच जाणवत आहे. त्याच्या निधनानंतर त्यांची जागा घेईल असे नवे नेतृत्व अद्याप तरी आकाराला आले नाही.मुंबई काँग्रेसच्या महिला अध्यक्षा म्हणून धडाडीने काम करणाºया शीतल म्हात्रे या गेली दोन वर्षे जणऐ अज्ञातवासातच आहेत. विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाºया, आंदोलनात अग्रभागी असणाºया म्हात्रे सध्या फारशा दिसत नाहीत़दृष्टिक्षेपात राजकारणयुतीची घोषणा झाली तरी स्थानिक राजकारणात आपण प्रतिस्पर्धीच आहोत, याची पक्की खात्री शिवसेना, भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आहे. पण, खासदारांनी मात्र स्थानिक शिवसैनिकांशी चांगले संबंध ठेवले आहेत.काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध अजूनही संपलेला नाही. त्यामुळे दहिसर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसची हक्काची ३५-४० हजार मते राखायची कशी, असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे.२००९ च्या लोकसभा लढतीत दहिसर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस उमेदवाराला सुमारे ४२ तर भाजपा उमेदवाराला ४७ हजार मते मिळाली होती. २०१४ च्या मोदी लाटेत भाजपाच्या मतांनी लाखांचा टप्पा ओलांडला. तर, काँग्रेसची मते ३४ हजारांवर आली. मतांचा वाढलेला टक्का भाजपा कायम राखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गल्लीतील भांडण गल्लीतच; युतीची अजब खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 1:08 AM