क्रॉस कनेक्शन, धमकीचा फोन असल्याचा संशय, ८ तासांचा गोंधळ, अखेर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ
By मनीषा म्हात्रे | Published: February 8, 2023 01:05 PM2023-02-08T13:05:35+5:302023-02-08T13:06:08+5:30
Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. दरम्यान, आज सकाळी जुहू इस्कॉन टेम्पलचे सर्वेश कुमार यांना एक फोन कॉल आला.
- मनिषा म्हात्रे
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. दरम्यान, आज सकाळी जुहू इस्कॉन टेम्पलचे सर्वेश कुमार यांना एक फोन कॉल आला. हल्ल्याचा कॉल असल्याचे समजून त्यांनी नियंत्रण कक्षात कळवले. मात्र आठ तासांच्या चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीने पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सकाळपासून टीव्हीवर सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कॉलच्या बातम्या पाहत असताना जुहूमधील इस्कॉन टेम्पलचे सर्वेश कुमार यांना एक फोन कॉल आला. या फोनमध्ये अनोळखी व्यक्तीने "सब तयार है ना, मै १७ तारीख को आ रहा हूँ, युसूफ को मिल लिया? शक हो गया" असे बोलून कॉल कट केला आहे.
फोन अचानक कट झाल्याने हल्ल्याचा कॉल असल्याचे समजून सर्वेश कुमार यांनी नियंत्रण कक्षात कळवले. पोलिसांनीही तात्काळ तपासाला सुरुवात केली. मात्र आठ तासांच्या चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीने पोलिसांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. कॉल करणाऱ्या व्यक्तीला भोपाळला कॉल करायचा होता. मात्र तो चुकून जुहू इस्कॉन टेम्पलचे कुमार प्रवेश यांना लागला. चुकीचा कॉल लागल्याचे समजताच समोरच्या व्यक्तीने कॉल कट केल्याची माहिती समोर आली. मात्र या क्रॉस कनेक्शन आणि चुकीच्या अंदाजामुळे पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या होत्या.