मुंबई : कोस्टल रोडच्या वरळीतील थडानी जंक्शन ते मरीन लाइन्स या मार्गातील बोगद्यात पालिकेकडून क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत. आपत्कालीन घटना घडल्यास इमर्जन्सी एक्झिटसाठी प्रत्येक ३०० मीटर अंतरावर हे क्रॉस पॅसेजेस बांधण्यात आले आहेत. संपूर्ण बोगद्यातून प्रवास न करता या क्रॉस पॅसेजेसमधून रेस्क्यू ऑपरेशन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही टाळता येणे शक्य आहे.
कोस्टल रोडच्या वरळी ते मरिन ड्राइव्ह या बोगद्यात असे एकूण १० क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत. या पॅसेजेसची लांबी ११ ते १५ मीटर असणार आहे. यापैकी काही पॅसेजेस वाहनांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी, तर काही पॅसेजेस प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी असणार आहे. पहिल्या टप्प्यात हे बोगदे खुले केले जाणार नसून संपूर्ण कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर बोगदे सुरू केले जातील.
कोस्टल रोड हा समुद्रालगत बांधला जाणारा पहिलाच प्रकल्प असून मानकांनुसार अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून दोन बोगदे बांधण्यात आले आहेत.
कुठे, काय बसविणार?
३० व्हिडीओ इन्सिडंट डिटेक्शन सिस्टीम कॅमेरा
८० पब्लिक ॲड्रेस स्पीकर
२४ सीसीटीव्ही कॅमेरे (इंट्री व एक्झिट व छेद बोगद्याजवळ)
स्पीकरवर माहिती मिळणार :
बोगदा व त्यातील भिंती या अतिउच्च तापमान सहन करू शकतील. एखाद्या वाहनाला आग लागल्यास तेवढे तापमान बोगदा व भिंती सहन करू शकतील. बोगद्याला ३७५ मि.मी. जाडीचा काँक्रीटचा थर लावण्यात आला आहे. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत अग्निरोधक फायरबोर्ड लावण्यात आले आहेत. बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी ‘क्रॅश बॅरियर’ असणार आहेत.- चंद्रकांत कदम, कार्यकारी अभियंता, कोस्टल रोड प्रकल्प.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी प्रत्येक ५० मीटर अंतरावर पब्लिक ॲड्रेस स्पीकर बसवण्यात आले आहेत. बोगद्यात १०० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. बोगद्याबाहेरील रस्त्यावर प्रत्येक ३०० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
मावळा बोगदा चार मजली इमारतीएवढा...
चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या ‘मावळा’ बोगदा बोअरिंग मशीनने तयार केला आहे. २.०७२ किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात आले आहेत.
८५ टक्के काम झाले असून फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात थडानी जंक्शन वरळी ते मरिन लाइन्स दरम्यान एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
या मार्गातच हे बोगदे तयार करण्यात आले आहेत. गिरगाव चौपाटी व मलबार हिलच्या खालून जाणाऱ्या या दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी ३.४५ किलोमीटर असणार आहे.