Join us  

दादरा नगर हवेलीच्या निमित्ताने शिवसेना - भाजपमध्ये कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 9:03 AM

देशभरातील तीन लोकसभा आणि २३ विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांवरून संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रात भाजपवर जोरदार टीका केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीचा निकाल हे शिवसेना, भाजपमधील कलगीतुऱ्याला नवे निमित्त ठरले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा निकाल भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव असल्याचे सांगत शिवसेना दिल्ली दरवाजापर्यंत धडक मारणार असल्याचे सांगून टाकले. यावर, एका विजयाने यांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पडू लागली. राऊत यांनी कोटही शिवायला टाकला असेल, अशी खोचक प्रतिक्रिया दिली.

देशभरातील तीन लोकसभा आणि २३ विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांवरून संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रात भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या हुकूमशाहीचा पराभव झाल्याचे सांगत शिवसेना आता दिल्ली दरवाजावर धडक मारायला सज्ज असल्याचे राऊत म्हणाले. राऊत यांनी  भाजपवरील केलेल्या या टीकेचा आशिष शेलार यांनी खोचक शब्दात समाचार घेतला. शिवसेनेने हुकूमशाहीबद्दल बोलणे म्हणजे दिवसाढवळ्या संध्याकाळचा आणि रात्रीचा चंद्र कसा दिसतो याचे वर्णन करण्यासारखे आहे. ते एक निवडणूक जिंकले; पण यातून भाजपसमोर संपूर्ण देशात आव्हान उभे केले वगैरेपासून थेट पंतप्रधान बनण्याचीही स्वप्ने पडत असतील. मंत्रिमंडळाची रचनाही केली असेल, खातेवापटही केले असेल, राऊत तर कोट शिवूनही बसले असतील. त्यामुळे तुमच्या स्वप्न रंजनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे, असा टोला शेलार यांनी लगावला.

यावर, कोट तुमचेच लटकून पडले आहेत. स्वप्न काय तुम्हालाच पाहता येतात का, आम्हीही स्वप्न पाहण्याची क्षमता राखून ठेवतो. महाराष्ट्रात काय झाले ते तुम्ही पाहिलेच आहे. २०२४ मध्येही पाहालच. तुमचे कोट भांडीवालीला द्यावी लागतील, असे प्रतिउत्तर राऊत यांनी दिले.

टॅग्स :भाजपाशिवसेना