लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील स्टारफिश या पालकांच्या संघटनेंतर्गत १४ विद्यार्थ्यांनी रेवस ते गेट वे आॅफ इंडिया हे २४ किमी अंतर साहसी जलतरण मोहिमेंतर्गत ४ तास ५५ मिनिटांत फत्ते केले. ही मोहीम फत्ते करणाऱ्या त्या साहसी विद्यार्थ्यांचे गेट वे आॅफ इंडिया येथे मुंबई पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन कौतुक केले. या रिले गटात वय ६ ते १८ वयोगटांतील कौस्तुभ मलबारी, आदित्य घाग, नील वैद्य, तनिष्का हेरवाडे, क्षितिज हेरवाडे, हर्ष पाटील, मानव मोरे, आशय दगडे, सोहम साळुंके, अपूर्व पवार, अथर्व पवार, सानिका नवरे, वेदान्त गोखले, ईशा शिंदे असे एकूण १४ विद्यार्थी होते. या जलतरण साहसी मोहिमेला भारतीय नौसेनेने मान्यता दिली होती. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी राज्य, आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. तसेच आॅलिम्पिक खेळांत सागरी जलतरण खेळाचा सहभाग केल्यामुळे पुढील भविष्यात भारताकडून एखादा खेळाडू पदकविजेता होईल, या आशेनेच या विद्यार्थ्यांना आतापासून प्रशिक्षित करण्यात येत आहे. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांपैकी काहींनी मालवण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विविध पदके मिळवली आहेत. ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त संजय हेरवाडे व संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आणि अनिल दगडे यांनी या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक सोयीसुविधा पुरवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ठाणे माजी महापौर संजय मोरे यांचेही मोलाचे सहकार्य मिळत असते. ही मोहीम सुरक्षितरीत्या पार पडण्यासाठी मुलांसोबत ४ बोटी होत्या. वैद्यकीय सेवा डॉ. शिवशंकर आकुसकर, जीवरक्षक म्हणून शशिकांत काळे, पृथ्वीराज कांबळे, मयंक चाफेकर, जय एकबोटे, यश पावशे, ओम जोंधळे, शुभम पवार, तर सागर मार्गदर्शन वासुदेव कोळी, प्रीतम कोळी, कुणाल कोळी यांनी केले.या वेळी महाराष्ट्र जलतरण संघटना पदाधिकारी आबा देशमुख, राजू पालकर, या स्पर्धेतील संस्थेच्या अध्यक्षा वैशाली नेरपगारे आणि सचिव मनोज कांबळे, प्रशिक्षक कैलाश आखाडे व नरेंद्र पवार, आॅब्झर्व्हर नील लबदे, सुनील मयेकर, पालक पोलीस अधीक्षक प्रकाश एकबोटे, पालक राजेश मोरे ठाणे परिवहन सदस्य आदी उपस्थित होते.
२४ किमी अंतर पार केले ४ तास ५५ मिनिटांत
By admin | Published: May 06, 2017 5:30 AM