कावळे, मावळे ते शिवस्वराज्य, राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 06:49 AM2019-08-22T06:49:31+5:302019-08-22T06:49:45+5:30

१९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर हा तर मराठ्यांचा पक्ष अशी टीका झाली.

crow, Mawale to Shivswarajya, NCP has changed language | कावळे, मावळे ते शिवस्वराज्य, राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा बदलली

कावळे, मावळे ते शिवस्वराज्य, राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा बदलली

googlenewsNext

- गौरीशंकर घाळे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, गडकिल्ले, मावळ््यांचा पराक्रम, शिवकालीन इतिहास... महाराष्ट्राच्या अस्मितेचीच ही प्रतिके. त्यांचा राजकीय पटलावर सर्वप्रथम जाहीर पुरस्कार केला तो शिवसेनेने. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे वारंवार या प्रतिकांच्या आधारेच आपल्या विचारांची मांडणी करत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ‘शाहू फुले आंबेडकर’ या त्रयींची धर्मनिरपेक्ष विचारधारा मांडत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे अलीकडील कार्यक्रम, वक्तव्ये तपासली तर या पक्षाचे धोरण, भाषा आणि प्रतीके बदलल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
१९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर हा तर मराठ्यांचा पक्ष अशी टीका झाली. स्वत: पवारांची ‘मराठा स्ट्राँगमॅन’ अशीच दिल्लीत ओळख आहे. मात्र, पवारांनी जाहीरपणे कधीच मराठा समाजाची पाठराखण केली नाही. उलट शाहू, फुले, आंबेडकर हेच त्यांच्या आजवरच्या राजकीय व्यासपीठावरील वैचारिक प्रतिकं राहिली आहेत. मात्र, २०१४ साली राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पवारांच्या तोंडून कळत-नळकत जातीय उद्गार बाहेर पडला. भाजपने कोल्हापूरच्या संभाजीराजेंना राज्यसभेवर घेतल्यानंतर पवारांनी केलेले वक्तव्य त्यांच्या आजवरच्या भूमिकेशी विसंगत होते. एवढेच नव्हे, तर आरक्षणासाठी झालेल्या मराठा आंदोलनामागे त्यांचीच शक्ती होती, अशीही चर्चा झाली. भाजप सरकारने मराठा आरक्षण दिल्यानंतर तर राष्टÑवादी काँग्रेसचा पायाच ठिसूळ झाला, अशी मांडणी अनेक राजकीय तज्ज्ञांनी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाची भाषा बदललेली दिसून येते.
अलीकडेच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीची मुंबईत बैठक झाली. चित्रा वाघ यांच्यासह अन्य नेत्यांच्या पक्षांतरावर भाष्य करताना ‘जे सोडून गेले ते कावळे, आता उरलेल्या मावळ्यांच्या जोरावर पक्षबांधणी करू’ अशा शब्दात पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भाषा शरद पवारांनी उच्चारली. अनेकांनी शिवसेना सोडली तेंव्हा ‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ हीच बाळासाहेबांची प्रतिक्रिया असायची.
राज्यात सध्या राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू आहे. यात्रेचे सारथ्य खासदार अमोल कोल्हे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी मालिकेमुळे अमोल कोल्हे यांची सध्या चांगलीच क्रेझ आहे. तर, उदयनराजे थेट शिवरायांचे वंशज आहेत. या दोन्ही नेत्यांची चलती आहे. त्यांचा स्वत:चा चाहता वर्ग आहे. याचा उपयोग पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी करण्याची भूमिका तरूणतुर्क नेत्यांनी घेतली. कोल्हेंच्या भाषणांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो.
शिवसेना आणि नंतरच्या काळात भाजपने शिवरायांचा नामजप
केला. त्याचा त्यांना लाभही झाला. आजवर जे झाले ते झाले.
पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारधारा मान्यच आहे. पण, जुन्याच पायवाटेने लोकांपर्यंत पोहचता येणार नाही. शिवराय आणि शिवकाळ महाराष्ट्राच्या अस्मितेचा भाग आहे. याचा अभिमान बाळगुनही पुरोगामी राजकारण करता येईल, ही आमची भूमिका होती आणि यात्रेला मिळणाऱ्या यशाने तेच अधोरेखित केल्याची भावना युवक आघाडीतील नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.

छत्रपती शिवरायांचे
जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडावरून ६ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. तर, रायगडावर या यात्रेची
सांगता होणार आहे. संपूर्ण यात्रेदरम्यान जास्तीतजास्त शिवकालीन वास्तू, ऐतिहासिक स्थळांना स्पर्श होईल याची दक्षता
घेण्यात आली.

Web Title: crow, Mawale to Shivswarajya, NCP has changed language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.