नोकरांची माहिती देण्यासाठी पाेलिस ठाण्यात गर्दी; ज्योती शहा हत्या प्रकरणानंतर अनेकांना जाग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:02 AM2024-03-15T10:02:12+5:302024-03-15T10:02:44+5:30
पोलिसांचे आवाहन.
मुंबई : मलबार हिल येथील ज्योती शहा हत्या प्रकरणानंतर परिसरातील रहिवाशांनी नोकरांची माहिती देण्यासाठी मलबार हिल पोलीस ठाण्यात गर्दी केली. तसेच, घरकामासाठी नोकर ठेवण्यापूर्वी त्याची चारित्र्य पडताळणी करून घेणे व पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन मुंबईपोलिसांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांत नोकरांवर कितपत विश्वास ठेवायचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चोरी, घरफोडी, फसवणूक, अपहरण, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांत दुकान व घरातील नोकरांचा सहभाग वाढत आहे.
परराज्यातून मोठ्या प्रमाणात कामगार मुंबईत काम करतात. व्यवसायाचा व्याप वाढत असल्याने मालक काही भार कमी करून नोकरांवर महत्त्वाची जबाबदारी देत. बहुतांश कामगार विश्वासू व प्रामाणिक असल्याने मालक बिनधास्त असतात. त्यांच्या जीवावर व्यवसाय सोडून ते बाहेरची कामे करतात. हा अतिविश्वास मालकांच्याच अंगलट येत असल्याचे मुंबईत घडणाऱ्या घटनांवरून समोर येत आहे.
काय काळजी घ्याल...
१) त्याची चारित्र्य पडताळणी करून घेणे
२) नोकराची कागदपत्रे, फोटो व शक्य झाल्यास त्याच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवा. तसेच, त्याचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्या.
३) नोकरासमोर पैशांचे व्यवहार किंवा संपत्तीचे प्रदर्शन टाळावे.
४) कपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्यावी
८ मे २०२३ सांताक्रूझमध्ये राहणारे मुरलीधर नाईक (८५) यांची केअरटेकर कृष्णा मनबहादूर पेरियार (३०) याने हत्या केली. घटनेच्या आठ दिवसांपूर्वीच त्याची नियुक्ती केली होती.
फेब्रुवारी २०२३ जोगेश्वरी येथे सुधीर चिपळूणकर (७०) आणि त्यांची पत्नी सुप्रिया (६९) यांच्यावर केअरटेकरने घरामध्ये चाकूने हल्ला केल्याने सुधीर यांचा मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. पप्पू जालिंदर गवळीला महिन्याभरापूर्वीच नियुक्त केले होते.
स्टेशन आले की टॉयलेटमध्ये लपायचा :
सहप्रवाशाच्या मोबाइल लोकेशननुसार पोलिसांनी रेल्वे पोलिसांना अलर्ट केले. तो भुसावळला पोहोचल्याचे समजताच, तो रसोलला जाणाऱ्या गाडीत असल्याच्या शक्यतेतून पोलिसांनी शोध घेतला. पोलिसांना पाहून तो रेल्वेच्या टॉयलेटमध्ये लपला. पोलिस गेल्याची खात्री होताच बाहेर निघाला. मात्र, साध्या गणवेशातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.