मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेपूर्वी मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी ‘एटीएम’मध्ये नोटांची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे खरेदीसाठी पैसे काढणाऱ्यांची अडचण झाली. मुंबईत बहुतांश ठिकाणी स्थिती सामान्य असली तरी ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांसह विदर्भ व मराठवाड्यात एटीएममध्ये नोटांचा खडखडाट होता.एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे समजताच पुणेकरांनी एटीएमबाहेर रांगा लावल्याचे दिसले. नागरिकांनी घाबरून जाऊन एटीएममधून पैसे काढण्यास सुरूवात केल्याचे दिसून आले. मागील दोन-तीन दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नसल्याचे चित्र होते. नोटाबंदीनंतरची स्थिती पुन्हा उद्भवणार की काय, या भीतीने अनेकांनी गरजेपेक्षा अधिक पैसे काढले. पिंपरी चिंचवड भागातही हेच चित्र होते. नाशिकला दोन-तीन दिवसांपासून चलन तुटवड्याची स्थिती अनुभवायला आली. मंगळवारी काही बँकांच्या एटीएममधून पैसेच निघत नव्हते. काही ठिकाणी दोन हजार रुपयांच्या नोटा अत्यल्प होत्या. अवेकांना शंभराच्या नोटांमध्येच रक्कम काढावी लागली.खान्देशात जळगावात बहुतांश एटीएममध्ये खडखडाट होता. धुळे व नंदुरबारला सामान्य स्थिती होती. कोल्हापुरला काही एटीएममध्ये शनिवारी व रविवारी चलन टंचाई निर्माण झाली होती. मात्र, सोमवारनंतर बहुतांशी ठिकाणी सेवा सुरळीत झाली. सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एटीएममध्ये पुरेसे पैसे होते. सोलापुरला दोन दिवसांपासून एटीएममध्ये पैशाची भासणारी कमतरता मंगळवारी बºयापैकी भरून निघाली. ग्रामीण भागात स्थिती सुधारण्यास आणखी काही वेळ लागेल.मराठवाड्यात टंचाई : औरंगाबादसह मराठवाड्यात दोन दिवसांपासून एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नांदेडमध्ये २०१ पैकी सोमवारी केवळ १२ एटीएममध्येच पैसे होते. मंगळवारी दुपारी काही ठिकाणी नोटा भरण्यात आल्या. परभणीत अर्धे एटीएम रिकामेच आहेत. बीडमध्ये टंचाई आहे. मोजक्याच ठिकाणी १००च्या नोटा उपलब्ध आहेत. जालन्यात अनेक ठिकाणी एटीएम बंदचे फलक लागले आहेत. लातूरमध्ये९० टक्के एटीएम बंद अवस्थेत आहेत.विदर्भ कॅशलेस : विदर्भात काही दिवसांपासून एटीएम कॅशलेस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐन लगीनसराईत नोटांची टंचाई जाणवत आहे. नागपुरातील एटीएमध्ये खडखडाट दिसून आला. बहुतांश बँकाच्या एटीएमपुढे ‘नो कॅश’ चे फलक लावण्यात आले. भंडारा, वर्धा येथे निम्मे एटीएम नोटांअभावी बंद होते. चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ येथेही वेगळी स्थिती नव्हती.
सर्वसामान्यांची पैसे काढण्यास ‘एटीएम’वर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:12 PM