विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रांसाठी गर्दी
By admin | Published: June 20, 2017 05:49 AM2017-06-20T05:49:07+5:302017-06-20T05:49:07+5:30
दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात विविध सवलतींसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात विविध सवलतींसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राबाहेर गर्दी केली आहे. तरी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलसह महा-ई-सेवा केंद्रांचा आधार घेण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
महाविद्यालय प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर विविध सवलतींसाठी उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र अशा प्रमाणपत्रांची गरज विद्यार्थ्यांना भासते. मार्च महिन्यानंतर या प्रमाणपत्रांची जुळवाजुळव करण्याची गरज
असते. मात्र उशिरा जाग आलेले बहुतेक विद्यार्थी प्रवेशाची अंतिम तारीख तोंडावर असताना सेतू
सुविधा केंद्रांवर धाव घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्रावर अधिक गर्दी झाल्याचे चित्र दिसते. अर्जदारांचे योग्य नियोजन करण्यासाठी या ठिकाणी टोकण दिले जाते. पूर्वी
ही वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान मर्यादित होती.
मात्र सद्य:परिस्थितीत या वेळेत सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुविधेसाठी मुंबई शहरात जिल्हाधिकारी कार्यालय वगळता तहसील कार्यालय नाही. मात्र सेतू सुविधा केंद्राशिवाय ‘आपले सरकार’ या पोर्टलवरून नागरिकांना घरबसल्या सर्व प्रमाणपत्रे मिळवण्याची सुविधा उपलब्ध
करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा लाभ
घेत केंद्राबाहेरील गर्दी टाळण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे
यांनी केले आहे. त्या म्हणाल्या
की, शासनाने मुंबई शहरात एकूण
२४ महा-ई-सेवा केंद्रे उभारली
आहेत. त्या ठिकाणी नागरिकांना
सर्व प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध होतील.