लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर येथील अत्यंत दाट लोकवस्ती असणाऱ्या मार्ग क्रमांक दोन येथे दररोज सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पहायला मिळत आहे. या ठिकाणच्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या रस्त्यांवर सायंकाळच्या वेळेस नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. त्यामुळे भविष्यात येथे कोरोनाची स्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते.
प्रशासनाने सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. असे असताना देखील या ठिकाणी दिवसभर दुकाने सुरू ठेवण्यात येतात. त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाले देखील ठाण मांडून बसतात. रात्री १० वाजल्यानंतर देखील येथे खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. या गर्दीमध्ये एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहत नाही. त्याचप्रमाणे अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नसतो. त्यामुळे ही गर्दी कोरोनाला खुले निमंत्रण देत आहे. पालिका व पोलीस प्रशासनाला न जुमानता येथे नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
.................................