लर्निंग लायसन्ससाठी वडाळा आरटीओ कार्यालयात नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:06 AM2021-06-24T04:06:32+5:302021-06-24T04:06:32+5:30
मुंबई : एकीकडे कोरोनाच्या आरटीओच्या अनेक बंद सेवा सुरू करण्यात आल्याने नागरिक आरटीओ कार्यालयात गर्दी करीत आहेत. बुधवारी वडाळा ...
मुंबई : एकीकडे कोरोनाच्या आरटीओच्या अनेक बंद सेवा सुरू करण्यात आल्याने नागरिक आरटीओ कार्यालयात गर्दी करीत आहेत. बुधवारी वडाळा आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्ससाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
सारथी ४.० या अद्ययावत प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकांशी संलग्न असलेल्या ऑनलाइन शिकाऊ वाहनचालक परवाना तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाइन प्रणालीचे लोकार्पण नुकतेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते.
कोरोनाच्या काळात आरटीओ कार्यालय बंद होते. नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले. कोरोनाच्या काळात लर्निंग लायसन्ससाठी कमी मुलाखती घेऊन योग्य ती काळजी घेतली जायची. लर्निंग लायसन्सकरिता येणाऱ्या प्रत्येकाला गेटवरच थांबवून तोंडाला मास्क बंधनकारक करत, त्याचे शरीराचे तापमान चेक करून, सॅनिटायझर केल्यावर फक्त एकालाच कार्यालयात पाठविले जात होते
मात्र आता प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर नसते आणि तापमान तपासणी केली जात नाही, असे एका उमेदवाराने सांगितले.
सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा
आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्ससाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामध्ये अनेक वेळा परीक्षा देणाऱ्या उमेदवारासोबत दोन ते तीन जण येतात. आलेले सर्वजण सोबत बसतात. तर काही जण आपला नंबर येईपर्यंत इतरांशी बोलत बसतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगकडे दुर्लक्ष होत आहे.
आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्ससाठी गर्दी होऊ नये म्हणून वेळेचे नियोजन केले आहे. मात्र अनेक उमेदवार वेळेच्या एक दोन तास आधी येतात. तर काही उमेदवार नातेवाईक किंवा मित्रांना सोबत घेऊन येतात. त्यामुळे गर्दी होते, ऑनलाइन सेवेचा वापर केल्यास गर्दी कमी होईल असे आरटीओ विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.