Join us

धनमिल नाक्यावर भाविकांची गर्दी

By admin | Published: October 16, 2015 2:36 AM

प्रभादेवी येथील शिवशक्ती नगर नवरात्रौत्सव मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तामिळनाडूमधील तंजावर येथील हजारो वर्षे पुरातन अशा बृहदीश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे

मुंबई : प्रभादेवी येथील शिवशक्ती नगर नवरात्रौत्सव मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तामिळनाडूमधील तंजावर येथील हजारो वर्षे पुरातन अशा बृहदीश्वर मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. त्यात मंदिरावर केलेल्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या आकर्षक रोषणाईमुळे ‘धनमिल नाक्याची महालक्ष्मी’ भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष संस्मरणीय करण्यासाठी यंदा हा भव्य देखावा उभारल्याचे मंडळाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रमोद केळुसकर यांनी सांगितले. ‘धनमिल नाक्याची महालक्ष्मी’च्या दर्शनाच्या निमित्ताने भक्तांची एक इच्छाही पूर्ण व्हावी म्हणून केळुसकर यांनी पुढाकार घेऊन हा देखावा उभारल्याचे मंडळाने सांगितले. मात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पंधरा दिवस अपार श्रम घेतल्यानंतर ही भव्यदिव्य आणि पुरातन मंदिराची प्रतिकृती प्रत्यक्षात उतरल्याचे केळुसकर सांगतात.केळुसकर म्हणाले की, तंजावर येथे १०१० साली सम्राट राजेंद्र चोला यांनी बृहदीश्वर हे ऐतिहासिक मंदिर उभारल्याचा इतिहास आहे. त्याची हुबेहूब प्रतिकृती उभारणे जागेअभावी अशक्य होते. म्हणून त्याप्रमाणेच दिसणारी प्रतिकृती प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय पांचाळ यांच्या मदतीने अवघ्या १५ दिवसांत उभारण्याचे आव्हान समोर होते. तब्बल ६६ मीटर उंच असलेल्या या मंदिराची प्रतिकृती कमी जागेत आणि कमी कालावधीत साकारण्याचे आव्हान पांचाळ यांनी सहज पेलले. त्यासाठी २०० कामगार आणि कलाकारांची फौज अहोरात्र मेहनत घेत होती.