मुंबई : गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील विविध सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीत चोरट्यांनी हातसफाई केली. यात लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सर्वाधिक मोबाइल, दागिने चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे.लालबागचा राजा, मुंबईचा राजा गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, परळचा महाराजा, अंधेरीचा राजा, तेजूकाया मेन्शन, रंगारी बदक चाळ, खेतवाडीचा राजा, चेंबूरचा सह्याद्री मित्रमंडळ अशा मंडळातील बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रमुख मंडळातील बाप्पांच्या गर्दीत सहभागी होत भक्तांच्या किमती ऐवजावर हात साफ केला. लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सर्वाधिक चोरीच्या घटना घडल्या. दरवर्षी याच गर्दीत ३०० ते ३५० मोबाइल, दागिने, पर्स चोरीच्या घटनांची नोंद होते. या वर्षी सुरुवातीच्या ९ दिवसांत ९७ गुन्ह्यांची नोंद झाली. रविवारी तक्रार नोंदीसाठी काळाचौकी पोलिसांना तब्बल ५ स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले होते. रविवारी दिवसभरात ११० तक्रारींची नोंद झाली. संध्याकाळपर्यंत आकडा ३०० ते ४००पर्यंत गेल्याचे काळाचौकी पोलीस सूत्रांनी सांगितले.लाखोंचे दागिनेही चोरीस गेले. यामागे गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील लुटारूंच्या गँगचा समावेश असण्याची शक्यता आहे.
भक्तांच्या गर्दीत चोरट्यांची हातसफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 5:45 AM