क्राउड फंडिंग :बनावट बिलाच्या आधारावर पैसे उकळण्याचे प्रकार

By संतोष आंधळे | Published: August 29, 2022 08:20 AM2022-08-29T08:20:40+5:302022-08-29T08:23:14+5:30

Crowd Funding: मिलाप या क्राउड फंडिंग वेबसाइटवरील अनियमितता उघडकीस आल्यावर, दिल्ली येथील डॉ. अलोक गुप्ता यांनीही केटो नावाच्या वेबसाइटच्या क्राउड फंडिंगची धक्कादायक कहाणी समाजमाध्यमावर मांडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Crowd Funding: Extortion of money on the basis of fake bills | क्राउड फंडिंग :बनावट बिलाच्या आधारावर पैसे उकळण्याचे प्रकार

क्राउड फंडिंग :बनावट बिलाच्या आधारावर पैसे उकळण्याचे प्रकार

Next

- संतोष आंधळे
मुंबई : मिलाप या क्राउड फंडिंग वेबसाइटवरील अनियमितता उघडकीस आल्यावर, दिल्ली येथील डॉ. अलोक गुप्ता यांनीही केटो नावाच्या वेबसाइटच्या क्राउड फंडिंगची धक्कादायक कहाणी समाजमाध्यमावर मांडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून  ‘एक व्यक्ती मी दिलेल्या बिलाच्या अंदाजपत्रकात खाडाखोड करून पैसे उभारण्यासाठी खोटे कॅम्पेन चालवीत आहे. यापासून सावध राहा’ असे म्हटले आहे. यावर परळ येथील  टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक प्रमेश सी. एस. यांनी जोरदार आक्षेप घेत ट्विटरवरच ‘केटो’ला खडे बोल सुनावले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे  वैद्यकीय मदतीच्या नावाखाली सुरू असलेल्या धंद्याला चाप बसणार तरी कधी? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
केटो क्राउड फंडिंग वेबसाइटवर देशभरातील हजारो रुग्ण आपली कहाणी व्यक्त करून वैद्यकीय उपचारासाठी मदतीसाठी याचना करत असतात. त्यांची दुःखद कहाणी ऐकून अनेकजण सढळ हस्ते त्यांनी दिलेल्या बँक अकाउंटवर पैसे जमा करत असतात. मात्र, त्याचा काही नागरिक गैरफायदा घेत असल्याचा प्रकार  उजेडात आला आहे.  
डाॅ. गुप्ता दिल्ली येथील प्रथितयश रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या एका रुग्णाच्या उपचाराकरिता बिलाचे अंदाजपत्रक बनवून दिले होते. मात्र, त्या अंदाजपत्रकावर खाडाखोड करून मदतीचे खोटे कॅम्पेन चालवत असल्याचे आढळल्यानंतर डॉ. गुप्ता यांनी याबाबत समाजमाध्यमांवर जाऊन हल्लाबोल चढविला. त्यांनी  बिलाचे अंदाजपत्रक ट्विटरवर अपलोड करून केटोला याबाबत विचारणा केली.

कायदेशीर समिती योग्य कारवाई करणार
यावर केटोने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रत्युत्तर देत,  चुकीच्या पद्धतीने कॅम्पेन सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिल्याबद्दल डॉ. गुप्ता यांचे आभार मानले. या प्रकरणाची दखल घेत आम्ही हे  कॅम्पेन थांबवित असल्याचे नमूद केले आहे. या प्रकाराने आम्ही व्यथित झालो आहोत. याप्रकरणी जे काही पैसे जमा झाले होते ते आम्ही परत केले आहेत. आमची कायदेशीर समिती या संदर्भात योग्य ती कारवाई करणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. 

केटोच्या उत्तरावर टाटा मेमोरियलचा संताप
केटोच्या या उत्तरावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक प्रमेश सी. एस. यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी ट्विटरवरच केटोची खरडपट्टी काढत उत्तर दिले. हे उत्तर योग्य नाही. तुम्ही अशा चुकीच्या पद्धतीने खोटारड्या कॅम्पेनची दक्षता आधीच का घेत नाही. नागरिक तुम्ही चांगले काम करताय यावर विश्वास ठेवतात. एक कॅम्पेन बंद करून तुम्ही १००० चुकीच्या कॅम्पेनला मदत करत आहात, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Crowd Funding: Extortion of money on the basis of fake bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.