लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राजावाडी रुग्णालयात रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याची घटना घडल्यानंतर आता रुग्णालयातील स्वच्छतेच्या निकषांविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयात पाहणी केली असता, या रुग्णालयातील आवारात अस्वच्छता दिसून आली आहे.
केईएम रुग्णालयातील परिस्थिती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता पूर्ववत होत आहे. कोविडसह नाॅनकोविड रुग्णांवर काहीअंशी उपचार कऱण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, या रुग्णालयावर ताण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असल्याने आवारात कचऱा साठून असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे, काही रुग्णांना वा नातेवाइकांना वार्ड बाहेर वगैरेही पाण्याच्या बाटल्या, पिशव्या ठेवल्याने अस्वच्छता दिसून येत आहे.
केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वॉर्ड क्रमांक ९ आणि दहामधील भागात अस्वच्छतेचे सहज दर्शन घडते. स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असताना रुग्णालयाचा हा परिसर अस्वच्छतेने व्यापला आहे. बंद अवस्थेतील लिफ्ट, अपुरे कर्मचारी, रुग्णांकडून होणार अस्वच्छता, आदी अनेक समस्यांनी तोंड वर केले आहे. जागोजागी पानाच्या आणि गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून रुग्णालय परिसरात अस्वच्छता पसरविण्याचे काम रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक करीत असल्याने रुग्णालयातील कर्मचारीदेखील बेजार झाले आहेत. त्यामुळे अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे फलक रुग्णालयाच्या इमारतीत लावण्यात आले आहेत.
केईएम रुग्णालयात टेलिमेडिसीन सुविधाही सुरू आहे. शिवाय, मुंबईबाहेरील कोरोना रुग्णांसह म्युकरमायकोसिच्या संसर्गावर उपचार घेण्यासाठी रुग्ण येत असल्याने पालिकेच्या या रुग्णालयावर सतत ताण असल्याचे चित्र आहे. गेली दीड वर्ष कोविडच्या काळात हजारो रुग्णांवर या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्या रुग्णांना कोविडमुक्त केले आहे.