मुंबई - गेल्या २ वर्षापासून कोविडमुळे गणेशोत्सवावर निर्बंधाचे सावट आले होते. परंतु यंदा शिंदे-फडणवीस सरकारने सर्व निर्बंध हटवल्यानं मुंबईत गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत उत्साहात साजरा केला जात आहे. गणपतीच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अनेक मोठमोठ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती मंडपात पोहचल्या आहेत. आज चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात गणेश भक्तांनी स्वागत केले.
यंदा चिंचपोकळीच्या गणेशोत्सव मंडळाचं १०३ वे वर्ष आहे. त्यात मागील २ वर्ष आगमनावेळी कुठलाही जल्लोष नव्हता. यंदा गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी चिंचपोकळीत केल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेश भक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी याठिकाणी लाखो गणेशभक्त आपल्या लाडक्याचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहचत असतो. शनिवारी सकाळी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा होता. यावेळी गणेश भक्तांची अलोट गर्दी पाहून डोळे दिपले.
चिंचपोकळीचा चिंतामणी बकरी अड्डा याठिकाणी प्रसिद्ध मूर्तिकार खातूंच्या कारखान्यात बनवली गेली आहे. यावेळी भक्तांचा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. मात्र या आगमन सोहळ्यातील गर्दीने स्थानिकांना त्रास सहन करावा लागला. आगमनाच्या मिरवणुकीला आलेल्या भक्त जणांनी येथील स्थानिकांच्या वाहनांवर चढून आगमनाची मज्जा लुटली. त्यामुळे कारखान्याच्या बाजूला असलेल्या १०-१२ चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. ह्या वाहनांची बोनेट्स, बंपर, पुढच्या काचा, दरवाजाचे नुकसान झाल्याचं समोर आले.