मुंबई – नवरात्रीनिमित्त मुंबईत तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे. गेल्या ८ दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात राजकीय पक्षांनीही अनेक विभागात नवरात्रौत्सव साजरा करत रासगरबा आयोजित केलाय. त्यात लालबाग, परळ, शिवडी, काळाचौकी या मराठी बहुल भागात भाजपाने यंदाही मराठी दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे. या दांडिया महोत्सवाला मराठी लोकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भेट दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काळाचौकीत दम आहे. आईनं आपल्या सर्वांना सुख समाधानी, आरोग्य, ऐश्वर्य प्रदान करावे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आम्हालाही शक्ती द्यावी. आईनं शक्ती दिली आणि तुम्ही ताकद दिली त्यामुळे आपल्या सणांवरील सगळे निर्बंध संपले. आता कुणी थांबवू शकत नाही. कारण दुर्गामातेला, आई भवानीला मानणारे तुमचे सरकार इथं आलेले आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत विकास करतोय. मोदींनी देशाला जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनवलेले आहे. आता तिसरी अर्थव्यवस्था होणार असून त्यानंतर पहिल्या क्रमांकावर माझा भारत देश असणार आहे. त्यामुळे मोदींना शक्ती द्या, ताकद द्या, आशीर्वाद द्या, तुमचाही आशीर्वाद मोदींना द्या असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित लोकांना आवाहन केले.
काळाचौकीच्या अभुदयनगर येथील मैदानात भाजपाकडून मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात मराठी गायक अवधुत गुप्ते आणि टीमला या महोत्सवाची जबाबदारी दिली आहे. मराठी गाण्यांवर याठिकाणी गरबा खेळला जातो. भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडून या मराठी दांडियाचे आयोजन होते, यंदा भाजपाचा मराठी दांडिया महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. याठिकाणी लोकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या भागात भाजपाचा मराठी दांडिया चांगलाच गाजत असल्याची चर्चा आहे.