दादरच्या प्लॅटफॉर्म १० वरील गर्दी घटणार, ११ नंबरच्या फलाटावरूनही पकडा लाेकल
By नितीन जगताप | Published: January 1, 2024 02:56 PM2024-01-01T14:56:33+5:302024-01-01T14:57:11+5:30
यामुळे दोन्ही फलटांवरून जलद लोकल पकडणे शक्य होणार आहे. नववर्षात गर्दीमुक्त जलद प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई : मध्य-पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसचे जंक्शन असल्यामुळे दादर रेल्वेस्थानकात प्रवाशांचा नेहमीच राबता असतो. रोजची सात लाख प्रवाशांची ये-जा असते. फलाट क्रमांक १० वरून जलद लोकल धावतात. १० आणि ११ फलाटांच्यामध्ये असलेल्या लोखंडी जाळीचे कुंपण आहे. हे हटवून लोकल पकडण्यासाठी फलाट क्र.११ चा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे दोन्ही फलटांवरून जलद लोकल पकडणे शक्य होणार आहे. नववर्षात गर्दीमुक्त जलद प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई विभागात प्लॅटफॉर्मची गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दादर स्थानकातील फलाट क्रमांक ८ चे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्याबरोबर फलाट क्रमांक १०/११ दुहेरी बाजूंची कामं सुरू आहेत. कल्याणमध्ये फलाट क्र. ४/५ वरील सेवा इमारती पाडल्या आहेत, तर ठाणे येथील फलाट क्रमांक ५/६ च्या रुंदीकरणासाठी आणि पादचारी पूल तोडण्यासाठी सज्ज आहे. तसेच फलाटावरील दुकानांचे धोरणात्मकरीत्या स्थानांतर करण्यात आले, मेल/एक्स्प्रेस गाड्या इतर फलाटावर स्थलांतरित आल्या आहेत, यामुळे नववर्षात मध्य रेल्वेवरील प्रवास सुसाट होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
दादर रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक १० वरील गर्दी विभागण्यासाठी महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. नवीन वर्षात एप्रिलपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील सर्व कामे पूर्ण होणार आहेत.
- रजनीश कुमार गोयल, विभागीय व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे
दादर स्थानकात फलाट १० वर गर्दी असते. १० व ११ वरील अडथळा दूर होणार असल्याने डाऊन जलद लोकल पकडता येणार असल्याने गैरसोय टळणार आहे. मध्य रेल्वेचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.
- सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ
दादर स्थानकात प्रवाशांना डाऊन जलद लोकलमध्ये चढण्यास आणि उतरण्यास दुहेरी पर्याय उपलब्ध होईल, ही समाधानाची बाब आहे. दादरमध्ये फलाट ८ च्या विस्तारनंतर हा एक प्रवासीहिताचा निर्णय आहे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
मी दादर येथे कामाला असून, बदलापूरला जाताना गर्दीचा सामना करावा लागतो. कित्येकदा गर्दी असल्याने गाडीत चढता येत नाही. फलाट क्र ११ चा पर्याय उपलब्ध झाल्यास दिलासा मिळेल.
- प्रियांका काकडे, प्रवासी