- रोहित नाईकमुंबई : मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येण्याची घोषणा केल्यानंतर लगेच मुंबईकरांनी परिसरातील बाजारामध्ये गर्दी केल्याचे चित्र दिसले. यावेळी किराणा, मेडिकल, एटीएम, डेअरी अशा अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून आली. बोरिवलीमध्येही रात्री ८ वाजल्यानंतर सर्वच रस्ते गजबजलेले दिसले.पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशाला कोरोना विषाणूविरुद्ध लढण्याचा संदेश देताना पुढील तीन आठवडे भारतभर लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरात दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी बाहेर पडला. यामुळे दिवसभर शुकशुकाट पसरलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून आली.बोरिवली परिसरातही नागरीकांची रात्री ८ वाजल्यानंतर तोबा गर्दी दिसून आली. बाभई नाका, वझीरा नाका, डॉन बॉस्को, एमएचबी कॉलनी यासह संपूर्ण गोराई परिसरामध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली. या सर्व ठिकाणी असलेल्या किराणा दुकाने, डेअरी, मेडिकल, एटीम तसेच बाजार परिसरातील फेरीवाल्यांकडे नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र यावेळी नागरिकांनी कुठेही झुंबड न करता रांग लावून शांततेत आपापल्या गरजानुसार खरेदी केली. यावेळी अनेकांमध्ये गोंधळही दिसून आला. काही नागरिकांनी 'लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय चांगलाच आहे. पण कोणकोणती सेवा उपलब्ध असणार याबाबत कोणतीही स्पष्टता पंतप्रधानांनी केली नाही. किराणासारखी दुकाने सुरु राहणार की नाही याबाबत काहीही कल्पना नसल्याने आम्ही बाजारात आलो आहोत.’
Coronavirus: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 9:39 PM