Join us

मांगेली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

By admin | Published: July 20, 2014 9:55 PM

धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने रविवारी १० हजारांच्यावर पर्यटकांनी गर्दी करून मनसोक्त आनंद लुटला.

कसई-दोडामार्ग : सतत पडणाऱ्या पावसामुळे मांगेली धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने रविवारी १० हजारांच्यावर पर्यटकांनी गर्दी करून मनसोक्त आनंद लुटला. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे खोक्रल तिठा ते मांगेली धबधब्यापर्यंत पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पोलीस बंदोबस्त अपुरा पडत होता. ठिकठिकाणी रस्ता ब्लॉक होत होता. आंबोलीपेक्षा सर्व दृष्टीकोनातून सुरक्षित वाटणारा मांगेली धबधबा असून दिवसेंदिवस त्याचे महत्त्व वाढत आहे. गेल्या वर्षातील तुलनेनुसार यावर्षी प्रथमच रविवारी १० हजारांच्यावर पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे मांगेली ग्रामस्थ व पोलिसांची धांदल उडाली. रविवार असल्याने व पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी दोडामार्ग चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची तपासणी केली. खोक्रल तिठ्यापासून वातावरण थंडगार असल्याने पर्यटक कौटुंबिक परिवारासह आनंद लुटत होते. पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना अशक्य होत होते. पोलीस उपनिरीक्षक ए. पी. पवार पर्यटकांवर नजर ठेवून होते. तसेच पंचायत समिती सदस्य महेश गवस, चेतन चव्हाण, मांगेली ग्रामस्थ यांनीही याकामी सहकार्य केले. रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. यावर्षी मोठ्या प्रमाणात वाहने व पर्यटकांनी गर्दी केली होती. असे असताना दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. गेल्या रविवारी पर्यटकांनी दारुच्या नशेत येथील दुकाने फोडली होती. त्यामुळे आज ग्रामस्थांनी पूर्णपणे सर्व दुकाने बंद ठेवून पर्यटकांना धडा शिकविला.पर्यटकांना आवरा म्हणून अखेर मांगेली ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. अशा अपप्रवृत्तीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे धबधबा सुरु असेपर्यंत पोलीस बंदोबस्त द्या, अशी मागणी पोलीस निरीक्षक पी. एस. सूर्यवंशी यांच्याकडे महेश गवस, चेतन चव्हाण व ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)