मुंबई : वडाळा आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्सच्या मुलाखतीसाठी लोकांची गर्दी होत आहे. या लोकांची संगणक चाचणी वेळेत केली जाते.
कोरोनाच्या काळात आरटीओ कार्यालय बंद होते. नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले. कोरोनाच्या काळात लर्निंग लायसन्ससाठी कमी मुलाखती घेऊन योग्य ती काळजी घेतली जायची. लर्निंग लायसन्सकरिता येणाऱ्या प्रत्येकाला गेटवरच थांबवून तोंडाला मास्क बंधनकारक करत, त्याचे शरीराचे तापमान चेक करून, सॅनिटायझर केल्यावर फक्त एकालाच कार्यालयात पाठविले जात होते.
मात्र आता प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर नसते आणि तापमान तपासणी केली जात नाही, असे एका उमेदवाराने सांगितले.
आता दर दिवसाला सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत २५० लर्निंग लायसन्ससाठी मुलाखतीचे नियोजन असते; मात्र त्यापैकी जे उमेदवार येतील त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. येणाऱ्या प्रत्येकाला मास्क बंधनकारक करण्यात आले आहे.
२० ते २५ दिवसांत मिळते पक्के लायसन्स
लोकांना पक्के लायसन्स पोस्टाने राहत्या पत्त्यावर २० ते २५ दिवसांत मिळते. आरटीओ कार्यालयात ड्रायव्हिंग स्कूल आणि डीलर यांचे प्रत्येकी एक किंवा दोन जण हजर असल्याने दलालांशी लोकांना संपर्क करण्याची गरजच भासत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, काही दलाल कार्यरत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा
आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्ससाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामध्ये अनेकवेळा परीक्षा देणाऱ्या उमेदवारासोबत दोन ते तीन जण येतात. आलेले सर्वजण सोबत बसतात, तर काही जण आपला नंबर येईपर्यंत इतरांशी बोलत बसतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष होत आहे.
आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्ससाठी गर्दी होऊ नये म्हणून वेळेचे नियोजन केले आहे. मात्र अनेक उमेदवार वेळेच्या एक दोन तास आधी येतात, तर काही उमेदवार नातेवाईक किंवा मित्रांना सोबत घेऊन येतात. त्यामुळे गर्दी होते. या उमेदवारांनी ठरलेल्या वेळीच यावे तसेच आवश्यकता नसेल इतरांना सोबत आणू नये.
पुरुषोत्तम निकम, आरटीओ अधिकारी, वडाळा