तिसऱ्या दिवशीही लसीकरणासाठी गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:09 AM2021-03-04T04:09:58+5:302021-03-04T04:09:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालिका व सरकारी रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येत आहे. शहर, उपनगरात दुसऱ्या टप्प्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिका व सरकारी रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लसीकरण करण्यात येत आहे. शहर, उपनगरात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी कायम असलेली दिसून आली. पालिकेच्या जम्बो काेविड केंद्रांवरही ज्येष्ठ नागरिकांनी लस घेण्यासाठी भर उन्हात रांगा लावल्याचे चित्र होते. परंतु, अजूनही कोविन संकेतस्थळावर नोंदणीची समस्या न सुटल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या पदरी काहीशी निराशा येत असल्याचे दिसून आले.
लस घेण्यास इच्छुक नागरिकांची नावनोंदणीही सुरू झाली आहे. को-विन अॅपमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे ही नावनोंदणी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नाव आणि संपर्क क्रमांक नोंदविल्यानंतर १८० सेकंदांमध्ये ‘ओटीपी’ येणे अपेक्षित आहे. तो दोन तास हाेऊनही येत नाही.
दरम्यान, खासगी रुग्णालयात वाॅक इन लसीकरणासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक येताना दिसून आले. मात्र संकेतस्थळावरील नोंदणीच्या वेळेचा विचार करता ही प्रक्रिया अधिक लांबलचक होतानाचे चित्र आहे. तसेच खासगी रुग्णालय प्रशासन स्वतःच्या व्यवस्थापनाच्या दस्तऐवजीकरणासाठी अधिकचा अर्ज भरून घेत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी वेळखाऊ प्रक्रियेविषयी नाराजी व्यक्त केली.
लसीकरणासाठी आलेले राजानंद पाटकर म्हणाले, को-विन अॅपवरून नाव नोंदणीसाठी बराच प्रयत्न केला, मात्र ओटीपी न मिळाल्याने तो प्रयत्न सोडून दिला. सहज आरोग्य सेतू अॅपवरून नावनोंदणी करायचा प्रयत्न केला तेव्हा त्वरित नावनोंदणी झाली, मात्र लस घेण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मधील वेळ दाखवली जात आहे. खासगी रुग्णालयांची यादी उपलब्ध झाल्यावर प्रयत्न करून पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शांतीलाल गुप्ता म्हणाले, को-विन अॅपवरून नावनोंदणी होऊ शकली नाही, म्हणून को-विन संकेतस्थळावरून प्रयत्न केला, पण तोही पूर्ण झाला नाही. परंतु, एका मित्राने थेट ‘वाॅक इन’द्वारे नावनोंदणी केली असता ही प्रक्रिया जलद झाली आणि लस घेण्यासाठी दुसऱ्या दिवशीची निश्चित वेळही मिळाल्याने त्यांनी सांगितले.
मुंबईत दिवसभरात ४५ ते ६० वयोगटातील ४१ व ६० वर्षांहून अधिक वयोगटातील २७५ म्हणजेच एकूण ३१६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.