मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तरी देखील मुंबईमधील बाजारपेठांमध्ये गर्दी कमी होता होत नाही. हार्बर रेल्वेमार्गावरील शिवडी स्थानकाच्या शेजारी दररोज सकाळी भरणाऱ्या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी विक्रेते व ग्राहक एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखत नाहीत. त्याचप्रमाणे अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नसतो त्यामुळे हा बाजार कोरोनाच्या संसर्गाचे केंद्र बनू शकते.
शिवडी स्थानकाच्या बाहेर दररोज फळे, भाज्या, व मासळीचा बाजार भरतो. संपूर्ण मुंबईतून याठिकाणी होलसेल दराने सुकी मासळी घेण्यासाठी ग्राहक येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथून सुक्या मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे सकाळी सात ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ग्राहकांची एकच झुंबड उडते. या गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी पोलीस याठिकाणी वारंवार एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करतात. मात्र नागरिक पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा एकदा गर्दी करतात. या गर्दीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.