लोकल, एसटी आणि बेस्ट बसेसमध्ये गर्दी घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:06 AM2021-04-24T04:06:49+5:302021-04-24T04:06:49+5:30
रेल्वे स्थानकांतील अनेक प्रवेशद्वारे बंद लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ...
रेल्वे स्थानकांतील अनेक प्रवेशद्वारे बंद
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १ मेपर्यंत राज्यात कठोर नियमांसह लॉकडाऊन जाहीर केला आहे. लोकल, मोनो, मेट्रो यांमधून सामान्य नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नियमांचे काटेकोर पालन होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. तर दुपारी लोकल, बेस्ट आणि एसटी बसेस रिकाम्या धावत असल्याचे चित्र दिसून आले आहे. एकंदरीत मुंबईकरांचा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी विविध स्थानकांत प्रवेशद्वारांवर पत्र्यांचे बॅरिकेड्स उभारून तसेच तिकीट व पास नाकारून सर्वसामान्यांना लोकल प्रवासास मनाई केली. आज सकाळपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील फक्त शासकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे लोकल प्रवाशांची संख्या सकाळपासूनच रोडावली. प्रवाशांची संख्या कमी असल्याने आजपासून उपनगरीय मार्गावर रविवारचे वेळापत्रक चालविण्यात येणार आहे. आज ८० टक्के म्हणजे लाेकलच्या १,३९२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर मात्र १३०० फेऱ्या चालविण्यात येत आहेत.
२२ एप्रिल ते १ मेपर्यंत दरम्यानच्या कडक निर्बंध काळात बेस्ट बसेसला फक्त ५० टक्के क्षमतेने बसेस चालविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनचे द्वार बंद केल्यामुळे सकाळी मुंबईकरांनी बेस्टच्या बसेसकडे मोर्चा वळवला होता. त्यामुळे सकाळी बेस्टचा बसेसमध्ये काही प्रमाणात गर्दी दिसून आली आहे. मात्र दुपारनंतर बेस्ट बसेससुद्धा रिकाम्या धावत असल्याचे चित्र मुंबई आणि उपनगरात दिसून आले. सोमवारी बेस्ट उपक्रमाने ३ हजार ३११ बसेस चालविल्या होत्या. त्यातून १६ लाख १९ हजार प्रवाशांनी प्रवास केला. मात्र सोमवारच्या तुलनेत बेस्टच्या प्रवासी संख्येतही आज घट झाली. आज फक्त २ हजार ५०० बस रस्त्यावर धावल्या.